Wednesday, 20 September 2017

फॉर अ चेंज

"ये ना. बैस", त्यानं सोफ्याकडे हात केला.
आजूबाजूला त्याचं घर न्याहाळत ती सोफ्यावर बसली.

"बी कंफर्टेबल हां. आणि हो, इतक्या रात्री तेही असा मुसळधार पाऊस कोसळताना मी असं तुला घेऊन आलो घरी म्हणून संकोचु नकोस. अजूनतरी बायकोची थोडी धास्ती आहे मला.", असं म्हणून तो दिलखुलास हसला.

तिनं बारकाईनं त्याचं घर पाहिलं. भिंतीवर त्याच्या सुखी कुटुंबाची तसबीर लटकत होती. घर अगदी चकाचक होतं. बायको माहेरी गेल्यावर आपल्या घराच्या होणाऱ्या अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी असं तिला वाटून गेलं. क्षणभर मागच्या खेपेचं नवऱ्याशी झालेलं भांडणही आठवलं. तिनं घरात पाऊल ठेवताच कुबट वास तिच्या नाकात भरून राहिला होता. घरभर पसरलेली रद्दी, उष्ट्या भांड्यांनी भरलेलं सिंक, विस्कटलेलं बेडशीट, आणि हो, बेडरूम मधले संशयास्पद ग्लास. इतक्या दिवसांनी नवऱ्याला भेटण्याचा तिचा सगळा हुरूप या नजाऱ्याने कुठल्या कुठे पळाला होता.

एका क्षणात हे सारं तिच्या डोळ्यापुढे आलं, पण तिने कटाक्षाने ते विचार दूर ढकलले. तो तिच्यासाठी टॉवेल घेऊन अलेलंही तिला समजलं नाही.
"काय गं तंद्री, कॉलेजमधली सवय तशीच दिसते अजूनही", तिच्या डोक्यात टॉवेल टाकून तो हसत तिच्याकडे पहात होता.
त्याच्या गालावरच्या खळीकडे तिचं लक्ष गेलं. ती थोडी सैलावली.

"कॉफी घेशील ना?", त्यानं विचारलं.

"हो, मला एक चमचा साखर."

"मॅडम, हे काय सांगायला हवं का! कितीतरी कॉफी शॉप मध्ये हे वाक्य तुझ्या तोंडून मी ऐकलंय"

थोड्याच वेळात तो वाफळते कप घेऊन हजर झाला.

कॉफी पितानाची ती शांतता त्याला नको वाटली.

"तुझंही लग्न झालंय म्हणून विचारतो. डोन्ट बी ऑफेंडेड हां. मला एक सांग, लग्न झालं, कालांतराने मुलं झाली की तुम्हा मुलींच्यातली प्रेयसी कुठे हरवून जाते का गं?"

तिला हा प्रश्न अनपेक्षित होता.
"का? असं एकदम..", तिनं गोंधळून विचारलं.

"अगं बघ ना, मुलं बाळं झाली की त्यांचे डबे, होम वर्क, त्यांचं टाईम टेबल सांभाळणे, वाणसामान यात नवऱ्याचा तो इंटिमेट करणारा स्पर्श, ती नजर तुम्हाला काळतच नाही का? कधीतरी मुलांशिवाय मुव्ही पहावी, थ्री बी एच के फ्लॅट मध्ये मुलांना कधीतरी शेजारच्या बेडरूम मध्ये झोपवावं, कधीतरी मुलांना न घेता रेस्टॉरंटमध्ये जावं हे असं तुम्हाला वाटतच नाही?"

"हो, पण नवऱ्यामधला प्रियकर तरी कुठे पूर्वीसारखा ताजा असतो? तुम्हालाही कधी वाटत नाही, एखाद्या दिवशी क्रिकेटची मॅच सोडून तिला विचारावं की काही मदत हवीये का, किंवा कधीतरी एखादा गजरा? मुव्हीला तिनं यावं असं फक्त वाटतं तुम्हाला, पण कधी तिकिटं बुक करावी असं नाही वाटत?"

तिनं भुवया उंचावून प्रतिप्रश्न केला. तो विचारात गढून गेला.
तिच्या थोडं जवळ जात, तिच्या ओल्या केसांत बोटं फिरवत तो म्हणाला, "हो, पण कधीतरी चेंज हवाच असतो ना."

तिला त्या दोघांचे कॉलेजचे दिवस आठवले आणि तिलाही अनावर झालं.

त्याच्या शक्य तितक्या जवळ जात ती म्हणाली, "मुलांची काळजी घेता घेता तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय हे आधी नाही का सांगायचे?"
आता त्यालाही अनोळख्याचं नाटक पुरे झालं होतं, "आणि तू तरी कुठे बोललीस की तुही एका मोगऱ्याच्या वेणीची वाट पाहतेयस?"

"पण म्हणून हे असं परक्यासारखं वागायचं का?", डोळे पुसत ती त्याला अजून एकदा बिलगली.

"कधी कधी, फॉर अ चेंज आपल्याच आयुष्याकडे त्रयस्थ नजरेनं पहावं, न दिसलेले कानेकोपरे स्वच्छ दिसतात. म्हणून हे सारं नाटक. बाकी तुझ्या डोळ्यांत पाणी मला आजही आवडत नाही हां", तिच्या केसांतून हात फिरवत त्यानं तिला गोंजारलं. आणि दुसऱ्या हाताने हलकेच खोलीतला दिवा विझवला.

No comments:

Post a Comment