Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Wednesday, 22 July 2020

हमेशा की तरह

ती पुरीसारखी अलवार, छोट्याश्या आघातानेही खळ्ळकन् फुटणारी, आणि तो रगड्यासारखा शांत, स्थिर, खालून धग सोसूनही वरतून दाखवून न देणारा. त्याची काही जवळची लोकं माघारी तिला म्हणायची, किती हा तडतडबजा, जरा काही झालं की नुसती कुरकुर. आणि तिच्या जवळची लोकं त्याला म्हणायची, किती गं बाई तो भिडस्तपणा, कधीतरी बोलावं की घडघड. पण ते दोघे एकत्र असले म्हणजे कमालच, कराऱ्या पुरीला मऊसूत रगडा मिळून जी पाणीपुरी बनते ना, अगदी तस्संच! एकमेकांच्या नुसत्या आसपास असण्याने खुलून, फुलून येणारे ते दोघं एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले होते.

पण आज काही वेगळंच होतं चित्र. तशी ती चिडायची त्याच्यावर, भांडायची, हट्ट करायची. पण अबोला कधीच नाही धरायची. बडबड बडबड करत राहायची. पुरी नरम आहे म्हणजे हवामान ढगाळ झालंय हे रगड्याला लग्गेच समजलं.

"ए फुलबाजी, काय बिनसलंय?"

"कुठे काय, मस्त चाललंय आमचं", असं म्हणून एक खोटरडं हसू ओठांवर आलं

"मस्त? मस्त असताना इतकं गोड हसायचं असतं का?"

"तू जादूगार होतास का रे मागल्या जन्मी?"

"अगं भूगोलाचा अभ्यास केलाय ना. हवामान ढगाळ झालेलं कळतं मला"

"बरं"

"मग सांगा ना आम्हाला, फुलबाजीला काय झालंय?"

"फुलबाजीकडे पाहिलंयस का अलीकडे निरखून? सुतळी बॉम्ब झालाय नुसता. दंड, गाल पाहिलेस का किती फोफावलेत?"

"अच्छा, मग थोडी पाणीपुरी कमी खावी", चेहऱ्यावर चेष्टेचा नूर, पुरेपूर.

"तुलाही असंच वाटतं ना? आज शेजारच्या काकूंनी गाठलंच मला गाड्यावर आणि हेच हेच म्हणाल्या. सगळ्यांच्या डोळ्यात माझं पाणीपूरी प्रेम खुपतंय बाकी काही नाही. तुही तसलाच", आता डोळे काठोकाठ भरले, कधीही ओसंडून वाहू लागतील इतके.

"ए फुलबाजी, अगं मजा केली गं. काय त्या काकू सांगतात आणि तू ऐकते. त्यांना सांग रोज तुम्ही अजून साखरझोपेत असता ना तेव्हा आख्खे पाच किलोमीटर चालून आलेले असते मी", तिला मिठीत ओढत, कुरवाळत.

"काही खोटं कौतुक नकोय. हिम्मत असेल तर त्रुएस्ट फीडबॅक दे की", मिठीत न जाता, हट्टाने.

"ए फुलबाजी, नको ना चिडू. अगं मजा केली. बर चल माझ्यासोबत चल पाणीपुरी खाऊ. बघूच कोण काय म्हणतंय", तिचा हात आग्रहाने खेचत.

"मुळीच नाही. तोंडही नाही पाहणार पुन्हा पाणीपुरीचं"

"किती दिवस?"

"तू मला चॅलेंज देतो आहेस? बघ बरोब्बर एक महिना. आणि मगच खाईन पाणीपुरी. तेही मोजून 6 पुऱ्या बस्स"

हुश्श हा निर्धार जन्मभराचा नाहीये हे समजल्यावर तो सुखावला. कारण तिला पाणीपुरी आवडायची, आणि त्याला पाणीपुरी खाणारी ती.

30 दिवसांनंतर,

"ए फुलबाजी आज किती तारीख गं?"

"अठरा, का रे?"

"अग्गं मुली, अभिनंदन, तुझं चॅलेंज पूर्ण केलंस तू, चल ना गं पाणीपूरी खाऊ आता"

"अरे हो, खरंच की. चल आपण सेलिब्रेट करू. पण फक्त 6 पुऱ्या"

"हो हो हो, चल तर खरं"

"भैय्या मॅडम को एकदम मस्त गोलगप्पा खिलाओ."

"तू नाही?"

"आधी तू. तू मनसोक्त खा, नि मी तुला मनसोक्त पाहतो."

"काहीपण, माझ्यात काय आहे पाहण्यासारखं?"

"तू खा गं"

मग ती एकेक पुरी तोंडात घेत होती, आणि ती पुरी फुटून पाणी तोंडभर पासरायचं तेव्हा तिचे इवलेसे डोळे मिटून खोलवर श्वास घ्यायची..

.. पण सहाव्या पुरीला ती म्हणाली
"ही शेवटची हां"

"ए फुलबाजी, खा ना अजून"

"अजिबात नाही, आता तू खा"

मग त्यानं त्याच्या 5 पुऱ्या खाल्ल्या, आणि म्हणाला,
"भैय्या बस, हो गया. आखरीवाली नही चाहीये"

तिला वाटलं उगीच नियम केला, 6 पुऱ्यांचा. याच्या हातून खायची संधी गेली. मग ती म्हणाली, नेहमीच्या सवयीनं, 
"नही भैय्या देदो आखरीवाली, ज्यादा तीखी, हमेशा की तरह"

"नक्की ना" हे त्यानं डोळ्यातुन विचारलं आणि "अगदी नक्की" हे तिनं डोळ्यातूनच सांगितलं.

भैय्यानं हमेशा की तरह शेवटची तीखीवाली पुरी, त्याच्या ताटलीत ठेवली, ती त्यानं तिच्या ओठांवर अलगद सरकवली हमेशा की तरह,
आणि मग पुरी तिच्या तोंडात, आणि ती त्याच्या मिठीत अगदी अलगद सामावून गेली, हमेशा की तरह!

Wednesday, 20 September 2017

फॉर अ चेंज

"ये ना. बैस", त्यानं सोफ्याकडे हात केला.
आजूबाजूला त्याचं घर न्याहाळत ती सोफ्यावर बसली.

"बी कंफर्टेबल हां. आणि हो, इतक्या रात्री तेही असा मुसळधार पाऊस कोसळताना मी असं तुला घेऊन आलो घरी म्हणून संकोचु नकोस. अजूनतरी बायकोची थोडी धास्ती आहे मला.", असं म्हणून तो दिलखुलास हसला.

तिनं बारकाईनं त्याचं घर पाहिलं. भिंतीवर त्याच्या सुखी कुटुंबाची तसबीर लटकत होती. घर अगदी चकाचक होतं. बायको माहेरी गेल्यावर आपल्या घराच्या होणाऱ्या अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी असं तिला वाटून गेलं. क्षणभर मागच्या खेपेचं नवऱ्याशी झालेलं भांडणही आठवलं. तिनं घरात पाऊल ठेवताच कुबट वास तिच्या नाकात भरून राहिला होता. घरभर पसरलेली रद्दी, उष्ट्या भांड्यांनी भरलेलं सिंक, विस्कटलेलं बेडशीट, आणि हो, बेडरूम मधले संशयास्पद ग्लास. इतक्या दिवसांनी नवऱ्याला भेटण्याचा तिचा सगळा हुरूप या नजाऱ्याने कुठल्या कुठे पळाला होता.

एका क्षणात हे सारं तिच्या डोळ्यापुढे आलं, पण तिने कटाक्षाने ते विचार दूर ढकलले. तो तिच्यासाठी टॉवेल घेऊन अलेलंही तिला समजलं नाही.
"काय गं तंद्री, कॉलेजमधली सवय तशीच दिसते अजूनही", तिच्या डोक्यात टॉवेल टाकून तो हसत तिच्याकडे पहात होता.
त्याच्या गालावरच्या खळीकडे तिचं लक्ष गेलं. ती थोडी सैलावली.

"कॉफी घेशील ना?", त्यानं विचारलं.

"हो, मला एक चमचा साखर."

"मॅडम, हे काय सांगायला हवं का! कितीतरी कॉफी शॉप मध्ये हे वाक्य तुझ्या तोंडून मी ऐकलंय"

थोड्याच वेळात तो वाफळते कप घेऊन हजर झाला.

कॉफी पितानाची ती शांतता त्याला नको वाटली.

"तुझंही लग्न झालंय म्हणून विचारतो. डोन्ट बी ऑफेंडेड हां. मला एक सांग, लग्न झालं, कालांतराने मुलं झाली की तुम्हा मुलींच्यातली प्रेयसी कुठे हरवून जाते का गं?"

तिला हा प्रश्न अनपेक्षित होता.
"का? असं एकदम..", तिनं गोंधळून विचारलं.

"अगं बघ ना, मुलं बाळं झाली की त्यांचे डबे, होम वर्क, त्यांचं टाईम टेबल सांभाळणे, वाणसामान यात नवऱ्याचा तो इंटिमेट करणारा स्पर्श, ती नजर तुम्हाला काळतच नाही का? कधीतरी मुलांशिवाय मुव्ही पहावी, थ्री बी एच के फ्लॅट मध्ये मुलांना कधीतरी शेजारच्या बेडरूम मध्ये झोपवावं, कधीतरी मुलांना न घेता रेस्टॉरंटमध्ये जावं हे असं तुम्हाला वाटतच नाही?"

"हो, पण नवऱ्यामधला प्रियकर तरी कुठे पूर्वीसारखा ताजा असतो? तुम्हालाही कधी वाटत नाही, एखाद्या दिवशी क्रिकेटची मॅच सोडून तिला विचारावं की काही मदत हवीये का, किंवा कधीतरी एखादा गजरा? मुव्हीला तिनं यावं असं फक्त वाटतं तुम्हाला, पण कधी तिकिटं बुक करावी असं नाही वाटत?"

तिनं भुवया उंचावून प्रतिप्रश्न केला. तो विचारात गढून गेला.
तिच्या थोडं जवळ जात, तिच्या ओल्या केसांत बोटं फिरवत तो म्हणाला, "हो, पण कधीतरी चेंज हवाच असतो ना."

तिला त्या दोघांचे कॉलेजचे दिवस आठवले आणि तिलाही अनावर झालं.

त्याच्या शक्य तितक्या जवळ जात ती म्हणाली, "मुलांची काळजी घेता घेता तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय हे आधी नाही का सांगायचे?"
आता त्यालाही अनोळख्याचं नाटक पुरे झालं होतं, "आणि तू तरी कुठे बोललीस की तुही एका मोगऱ्याच्या वेणीची वाट पाहतेयस?"

"पण म्हणून हे असं परक्यासारखं वागायचं का?", डोळे पुसत ती त्याला अजून एकदा बिलगली.

"कधी कधी, फॉर अ चेंज आपल्याच आयुष्याकडे त्रयस्थ नजरेनं पहावं, न दिसलेले कानेकोपरे स्वच्छ दिसतात. म्हणून हे सारं नाटक. बाकी तुझ्या डोळ्यांत पाणी मला आजही आवडत नाही हां", तिच्या केसांतून हात फिरवत त्यानं तिला गोंजारलं. आणि दुसऱ्या हाताने हलकेच खोलीतला दिवा विझवला.

Wednesday, 12 July 2017

डोंगर चढुया नेटाने...!

(मैत्रिणीच्या आग्रहावरून एक जुनीच इंग्रजी पोस्ट मराठीतून रेपोस्टत आहे)

ऑक्टोबर महिना, साल २०११
"या वीकएंडला स्कंदागिरीला जायचं का?", संध्यकाळी जेवताना आमच्यातल्या कुणीतरी टूम काढली. आमची चेन्नईहून बेंगलोरला बदली होऊन जवळ जवळ तीन महिने उलटून गेले होते. आम्हाला सगळ्यांनाच स्कंदगिरीला जाण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे आम्ही लगेचच जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या काही उत्साही मैत्रिणींनी ट्रेकिंगसाठी वेगळी खरेदी पण केली.

कर्नाटकच्या चिकबळ्ळापूर जिल्ह्यात वसलेल्या स्कंदागिरीला "कलवरा दुर्ग" म्हणूनही ओळखले जाते. बेंगलोर - हैद्राबाद रोड अर्थातच राष्ट्रीय महामार्ग ७ वर बेंगलोरपासून ७० किलोमीटर अंतरावर स्कंदगिरी पर्वत आहे. स्कंदागिरीचे शिखर अंदाजे १४०० मीटर उंचीवर आहे. बेंगलोर आणि आसपासच्या परिसरात ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांचे हे फेव्हरेट डेस्टिनेशन आहे.

आम्हाला स्कंदागिरीला जाणाऱ्या बसेसबद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे आठ लोक बसतील अशी एखादी गाडी भाड्याने ठरवून जायचं आम्ही पक्कं केलं. पहिल्या १५० किलोमीटरसाठी २४०० रु. आणि नंतर प्रति किलोमीटर ९.५० रु. या दराने आम्ही एक इनोव्हा गाडी ठरवून निघालो.

रविवारी सकाळी ४ वाजताच आम्ही प्रवासाला सुरुवात केली. बाहेरचं वातावरण अतिशय थंड होतं. दोन अडीच तासात आम्ही स्कंदगिरीच्या पायथ्याशी पोचलो. आम्ही येताना गाडीमध्येच सोबत घेतलेला नाष्टा केला होता. त्यामुळे सगळेजण आता ट्रेक करण्यासाठी पूर्ण सज्ज होतो. आमच्या प्रत्येकाच्या सॅकमध्ये एक-दिड लिटरच्या पाण्याच्या बाटल्या, फळे, ग्लुकोज बिस्किटे आणि इतर बारीक सारीक सामान होतं. आमच्या "ट्रिप"ला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.

आम्ही ट्रेकिंगसाठी जी वाट निवडली होती ती फारच दुर्गम होती. सामान्यतः या वाटेने कुणीच जात नाही (गमतीची गोष्ट अशी कि हे आम्हाला शिखरावर पोहोचल्यावर समजलं)
पावसाळा संपून गेल्याने वाटेतल्या खडकांवरचं शेवाळं पूर्ण वाळून गेलं होतं. त्यामुळे मातीच्या रस्त्यावरून जाण्यापेक्षा खडकांवरून वर चढणं तुलनेनं सोपं होतं. प्रयत्न करत करत आम्ही छोट्या मोठ्या कातळांवरून पुढे जात होतो. वाटेवर खडकांत खोलवर घट्ट रुजलेलं गवत भरपूर वाढलं होतं. या गवताच्या आधाराने खालच्या खडकावरून वरच्या खडकावर जाणं शक्य होत होतं. वर चढताना पूर्ण वेळ आम्ही एकमेकांच्या सोबतीलाच होतो. जर एखाद्याला चढताना अडचण वाटली तर इतर कुणीतरी त्याला वर यायला मदत करत होतं. वर चढताना हाताचे तळवे खरचटून निघत होते. पण कड्यावरती पोचण्याच्या ध्येयापोटी या सगळ्याचा विसर पडला होता. आणि याच नादात अगदी मजेत आमची घौडदौड सुरु होती.

खडकांवरून वर चढणं जितकं कठीण होतं तितकंच रोमांचक आणि आनंददायीदेखील होतं. गाणी म्हणत, एकमेकांची टिंगल टवाळी करत, प्रसंगी थकलेल्यांना प्रोत्साहन देत, वेळ आणि चांगली जागा मिळेल तसे फोटो काढत आमचं डोंगर चढणं सुरु होतं. एव्हाना सूर्योदय होऊन उन्हं वर आली होती. तापमानात वाढ होईल तसं चढणं कठीण होत होतं. सगळ्यांनाच बऱ्यापैकी तहान आणि भूक लागली होती. सकाळी केलेला नाष्टा कुठच्या कुठे गुल झाला होता. पण खूप जास्त पाणी पिल्याने किंवा खाल्ल्याने शरीर जडावलं असतं आणि वर चढणं अजून जिकिरीचं झालं असतं. त्यामुळे पाचेक मिनिटांची विश्रांती घेऊन, गरजेपुरतं थोडंसंच खाऊन आम्ही पुन्हा चढती सुरु केली.




अखेर दोन तासांच्या अथक चढाईनंतर आम्ही स्कंदाबेट्टाच्या शिखरावर पोचलो होतो. अंदाजे ४६०० फूट उंचीवर पोचल्यानंतर दिसणारं दृश्य थक्क करणारं होतं. वरती निळंशार आभाळ, त्यात मजेत झुलणारे ढगांचे पुंजके, दूरवरून येत आणखी दूरवर जाणारा पक्षांचा थवा असा देखावा.. तर खाली पायथ्याशी दिसणारी इवली इवली घरं, अधेमध्ये चकाकणारे पाणवठे, हिरव्या रानांतून जाणारे तपकिरी रस्ते, मधूनच कुठेतरी संथपणे हलणारा गुरांचा कळप असा नजारा ! हे सारं डोळ्यांत साठवावं तितकं कमी ! जमिनीपासून इतक्या उंचीवर सोसाट्याचा वारा होता. या वाऱ्यामुळे, तिथल्या विलक्षण शांततेमुळे आणि आजूबाजूला दिसणाऱ्या लोभस सृष्टीमुळे वर येताना झालेल्या सर्व कष्टाचा विसर पडला. इतक्या उंचीवर पोचूनदेखील निसर्गाचे सारे अविष्कार पाहून आपण त्याच्यापुढे किती ठेंगणे आहोत याची जाणीव होत होती.

वरती पोहोचल्यावर मला फोटो काढायला अजून उधाण चढलं. मी सगळ्यांचे आनंदी आणि विजयी चेहरे केमेऱ्यात बंदिस्त करून घेत होते. मग सगळ्या बाजूंनी पायथ्याशी दिसणारे नजारे न्याहाळले. एव्हाना आमचं भारावलेपण बऱ्यापैकी कमी होऊन तहान आणि भुकेच्या जाणीवेनं मनाचा ताबा घेतला होता. वर शिखरावर आम्हाला मॅगी, अंड्याचे ऑम्लेट आणि थंड पाण्याच्या बाटल्या विकणारे काही स्थानिक लोक भेटले. हे लोक रोज इतक्या उंच चढून येऊन या गोष्टी विकतात. यातली प्रत्येक गोष्ट ५० रु.ला होती. फक्त शनिवार-रविवार दोनच दिवस या लोकांचा हा उद्योग जोमाने चालतो. म्हणून आम्हीही अजिबात घासाघीस ना करता त्यांच्याकडून पाण्याच्या काही बाटल्या आणि गरमा गरम मॅगी घेतली. (अर्थात त्यांच्याकडून खाणं घेण्याशिवाय आम्हाला इतर पर्यायही नव्हता ही बाब वेगळी !!)

मॅगीवर यथेच्छ ताव मारून झाल्यावर अर्ध्या एक तासाने आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. यावेळेस आम्ही दुसरा रस्ता निवडला होता. उतरणीचा मार्ग तुलनेने खूपच सोपा होता. पाऊणेक तासात आम्ही पायथ्याशी पोचलो. होस्टेलवर पोचेपर्यंत सगळ्यांच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या होत्या. तासभर आम्ही आळीपाळीने गरम पाण्याच्या बादलीत पाय बुडवून बसलो. थोड्या वेळाने होस्टेलच्या आंटीचा स्वयंपाक तयार झाला. आम्ही पेंगत पेंगतच सारू अण्णा खाऊन घेतला. आणि रविवार असूनदेखील नवाच्या ठोक्याला झोपी गेलो.



Road map


View Larger Map


ट्रेकिंगमधल्या नवख्या लोकांना या ट्रेकच्या निमित्ताने काही गोष्टी सांगाव्याशा वाटतायेत. ट्रेकिंग ही सहसा एकट्याने करण्याची गोष्ट नाही, विशेषतः तुम्ही अननुभवी असताना तर नाहीच नाही! शिवाय ५ ते ६ किंवा त्याहून अधिक जणांनी एकत्र केलेल्या ट्रेकिंगमध्ये एक वेगळीच मजाही असते. ट्रेकिंग करताना नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहणे इष्ट. जोडप्यांनी अथवा एकदोघांच्या गटाने संपूर्ण गटापासून अलिप्तपणे जाणे टाळावे. खूप उंचीवर मोबाईल फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जातात. त्यामुळे सतत एकेमकांच्या संपर्कात असणे अतिशय महत्वाचे असते. ट्रेकिंग करताना स्पर्धा करणे प्रकर्षाने टाळा. दुर्बल सदस्यांना मागे ठेऊन पुढे जाऊ नका. जागेच्या नकाशाची पुरेशी माहिती स्वतःजवळ असू द्या. (या बाबतीतही मोबाईल फोनवर अवलंबून राहणे तितकेसे योग्य नाही). दिशादर्शक सोबत असेल तर उत्तम. आपत्कालीन स्थितीचा सामना करता यावा म्हणून प्रथमोपचाराचे साहित्य आणि माफक औषधे नेहमी बरोबर ठेवावीत. खूप अवघड रस्ता असल्यास ट्रेकिंगची आधुनिक साधनेही सोबत ठेवावीत.

प्रत्येकाने स्वतःजवळ पुरेसे खाद्यपदार्थ आणि पाणी ठेवावे. हे अन्न शरीराला जडत्व देणारे नसावे. शरीराला त्वरित ऊर्जा देणाऱ्या गोष्टी (जसं कि लिंबू सरबत, संत्री, कलिंगड आणि तत्सम पाणीदार फळे, काकड्या इ.) सोबत घ्याव्यात. ग्लुकॉन-डी किंवा कार्बन डायऑक्साईड विरहित सरबते सोबत घेण्यासही हरकत नाही. शक्यतो कोकम सरबत, पन्हे अशा नैसर्गिक सरबतांना प्राधान्य द्यावे. अगदीच गरज लागली तर असावा म्हणून ग्लुकोज बिस्किटाचा एखादा पुडा जवळ घ्यावा. पण एक किंवा दोन बिस्किटे खाऊन थांबणे आवश्यक आहे. ब्रेड, चिप्स असे जड पदार्थ खाणे टाळावे. खारट पदार्थ खाणे किंवा फळांना मीठ लावून खाणे टाळावे, जेणेकरून जास्त तहान लागणार नाही. चढण्यापूर्वी स्थानिक लोकांकडून पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांबद्दल माहिती करून घ्यावी.

ट्रेकिंग करताना आपला पोशाख ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जमीनीवर उत्तम पकड घेणारे बूट घालणे अत्यावश्यक आहे. चढताना अथवा उतरताना अडथळा होणार नाही असे कपडे परिधान करावेत. कपडे खूप घट्ट किंवा खूप सैल, घेरदार, किंवा काट्याकुट्यात अडकतील असे नसावेत.

ट्रेकला जाण्यापूर्वी पंधराएक दिवस अनुलोम-विलोम किंवा भस्त्रिका असे प्राणायाम नियमितपणे केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. खूप जास्त उंचीवर सहसा ऑक्सिजनची कमतरता असते. अशा वेळी श्वसनाच्या नियमनाचा सराव असलेल्या व्यक्तींना ट्रेकिंग करणे सोपे जाते. नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांनाही ट्रेकिंगसाठी वेगळी शारीरिक तयारी करावी लागत नाही.

दिवस आहेत पावसाळ्याचे,
सह्यकड्यांना न्यहाळायचे... 
ट्रेकिंगसाठी  तुमची बॅग 
कधी करताय सांगा पॅक?

Monday, 10 July 2017

शाश्वत

वठलेल्या पिंपळाला चैत्राची पालवी फुटावी तसं झालंय,
माझ्याच मस्तकातुन इवली दोन पानं उगवावीत जणू, जुळलेल्या ओंजळीगत...

आपल्यात नव्यानं उभं राहू पाहणारं हे शाश्वत नातं असेलच नेहमी,
तुझ्या-माझ्या रक्ताइतकं प्रवाही

बदलतील त्याची वळणं,
कमी जास्त होईल त्यातला आवेग आणि जवळीक,
किंवा नेहमीच त्याची गुंफण राहील अगदी घट्ट...
सोसावे लागतील त्याला ऊन-पावसाचे खेळ,
आणि क्वचित ताटातुटीची ससेहोलपट...

आपल्यात रुजलेल्या नात्याला
कशाला द्यायचं काही नाव,
आणि का करायचा अट्टाहास, त्याची व्याख्या शोधण्याचा,
बाभळीसारखं काटेरी असू देत अथवा कदंबसारखं हिरवंकंच,
हे नातं आहे अगदी शाश्वत नि खरं
असु देत वाईट, किंवा बरं,
पण लक्षात ठेव,
हे नातं आहे, अगदी खरं,
तुला मला जोडणाऱ्या नाळेइतकं खरं !!

घर


मे महिना, साल २०१३
नुकताच साखरपुडा झालेला आणि नवीन आयुष्य सुरु करण्याची हुरहूर, उत्सुकता, कणभर भीती असं काही काही मनात सुरु होतं. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला बदली करून घ्यायची आणि दुसऱ्या आठवड्यात असेलल्या लग्नाच्या सुट्टीवर जायचं असं ठरलं. लग्न झाल्यावर मुंबईच्या नवीन घरी नव्या नव्या संसाराची स्वप्नं पाहताना असतानाच अचानक ऑफिसमधून वेगळीच बातमी समजली आणि आपण केलेला बेत तडीस जाणार नाही हे समजलं.

पुण्यातल्या ऑफिसमध्ये फक्त एका महिन्यासाठी मला काम देता येणार नव्हतं. त्यामुळे एकतर पुढचं पूर्ण वर्ष पुण्यात राहा किंवा आत्ता लगेच मे महिन्यातच मुंबईला जा असं सांगण्यात आलं. अर्थातच दुसरा पर्याय निवडण्याशिवाय काही उपाय नव्हता. त्यामुळे एखादं घर भाड्याने घेऊन तिथे मी एकटीने राहायचं, आणि लग्नानंतर अमृतने सोबत राहायला यायचं असं ठरलं.

दरम्यानच्या काळात मी कोल्हापूरला असताना व्हॅट्सऍप वरून घरांच्या फोटोंची देवाण घेवाण झाली. आणि आम्ही विक्रोळीमधील एक घर निश्चित केलं. घराचा भाडे करार ज्या दिवशी करायचा होता त्याच दिवशी मी मुंबईला गेले. पहिल्याच दिवशी भावी नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे ठाणे ते विक्रोळी असा लोकल प्रवास करून विक्रोळी आणि तिथून पुढे रिक्षाने पवईचं ऑफिस गाठलं. पहिलाच दिवस ऑफिसमध्ये नवीन सहकाऱ्यांशी ओळखी करून घेणे, नवीन कामाची माहिती घेणे, ऑफिसची बिल्डिंग फिरून पाहणे यात गेला. आणि अर्थातच फोटोमधलं घर खरं खुरं कसं असेल याच्या कल्पनेत गेला.

संध्याकाळी मी रिक्षाने विक्रोळीला गेले. घराचा भाडे करार व्यवस्थित पार पडला. घर तसं सुंदर होतं, पण घराला नुकताच लावलेला रंग आणि धूळ जागोजागी यथेच्छ पसरले होते. घरात ओटा आणि एक पोटमाळा वगळता एखादं भिंतीतील कपाट किंवा रॅक असं काहीच नव्हतं. फक्त एक बॅग भरून सामान घेऊन आलेल्या मला एकदमच सुनं सुनं वाटायला लागलं.  बाजूलाच पडलेला एक बॉक्स घेऊन  मी त्यावर माझी लालबुंद ओढणी अंथरली, आणि बॅगेतली गणपतीची गणपतीची मूर्ती त्यावर ठेवली. बॅगेतुन एक छोटा दिवा आणायलाही मी विसरले नव्हते पण तेल आणि काडेपेटी नसल्यामुळे तो लावणं शक्य नव्हतं. आम्ही दोघांनी गणरायाला मनापासून नमस्कार केला आणि आमच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद मागितले. सोबत आणलेल्या इलेक्ट्रिक शेगडीवर मी भात केला आणि आणि आम्ही पोटभर मेतकूट भात खाल्ला.

दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून डोळे उघडल्यावर मला जास्तच एकटं एकटं वाटू लागलं. रात्री झोपायला सोबतीला कुणी नसल्यामुळे एकतर झोप नीट झाली नव्हती, त्यामुळे अंगात एक विचित्र जडपणा आलेला होता. उठून मी खिडकी उघडली, आणि समोरचं दृश्य पाहून अंगातली सगळी मरगळ कुठच्या कुठे पळाली.

एक गर्द हिरवं जांभुळाचं झाड आणि अदृश्य ठिकाणाहून येणारा कोकिळेचा आवाज. जादूची काडी फिरवावी तसं झालं. पटापट आवरून मी ऑफिसला गेले. त्या दिवशी थोडं लवकर निघून, येताना दोन झाडू, एक केराची बादली, ५-६ डबे, दोन बादल्या, केराची सुपली, पायपुसणी, थोडं वाणसामान असं सगळं सामान घेऊन घरी परतले. आणि झपाट्याने कामाला लागले. संडास, बाथरूम, बेसिन, खिडक्या आणि तिन्ही खोल्या धुवून लखलखीत केल्या. ते धुळकट घर फक्त एक दोन तासांच्या मेहनतीने पुरतं बदलून गेलं होतं. अंघोळ करून गणपतीला दिवा लावला. अमृतनं हे घराचं पालटलेलं रुपडं पाहिलं तेव्हा तोही भलता खुश झाला.

घरी गेल्यावर जेव्हा हि सगळी हकीकत सांगितली तेव्हा डोळ्यांत  पाणी आणून आजी म्हणाली, "लागली माझी नातं संसाराला". हे सगळं आठवलं कि वाटतं, वास्तू  सगळ्या सारख्याच असतात. तिथे घालवलेले क्षण, त्या वास्तूवर आपण केलेलं प्रेम, तिथल्या कडू गोड आठवणी यातून त्याला घरपण मिळतं. त्यानंतर आणि त्या आधी मी अनेक ठिकाणी वास्तव्य केलं पण विक्रोळीच्या घराचा अनुभव मनात घट्ट बसून राहिलेला आहे.

Sunday, 27 April 2014

व्ही. आर्. एस्.

आजवर तू आहेस या खात्रीनं
असंख्य जीव तुझ्या उंबऱ्रयावर माथा टेकवत आले

गाभाऱ्यातल्या शेंदूर फासलेल्या दगडात तुच आहेस या समजुतीवर
कित्येक असुरक्षित मनं आपल्या भक्कम भविष्याची स्वप्नं पाहत राहिली

काळ्याकुट्ट अंधारात कितीतरी जणांनी चाचपडत अडखळत वाट सर केली
ती निव्वळ तुझ्या भरवशावर

…पण पांडुरंगा आता सगळं काही बदललंय बरं का…
आता तुझ्या अस्तित्वावरच आम्ही घाला घालून रिकामे झालोय
तुझ्या गभाऱ्यामध्ये आता फक्त आम्ही गल्ले भरुन घेतोय

तू असलास काय आणि नसलास काय फरक तसा फरसा पडत नाही
तुझं गुणगान केल्यावाचून किंवा तुला दंडवत घताल्यावाचून आताशा कुणाचंच काही अडत नाही
या भरलेल्या जगामध्ये आम्हाला आई-बापाचा पण भार होऊ लागलाय
गर्दीमधला आपलाच माणूस आम्हाला परका वाटू लागलाय

बळी खुशाल कान पिळतोय आणि सोसणारा निमूट मूग गिळतोय
आता तर भर उजेडातही नीतिमत्तेचा तोल ढासळतोय
पाप-पुण्य श्रद्धा-बिद्धा वगैरे सारं आता आउटडेटेड झालंय
डीजे डॉल्बी आणि ढोल ताशे हेच तुझ्याहुन थोर झालंय

आमच्या इथल्या देवळांमधुन आम्ही केव्हाच तुला हद्दपार केलंय
तू आता तुझ्या गावी निघून जा…
विठ्ठला, आम्ही व्ही. आर्. एस्. देऊन केव्हाच तुला निवृत्त केलंय

Tuesday, 3 September 2013

या वळणावरती

विलगलेल्या आकाशाची अलिप्त अलिप्त निळाई
शोधात किनारयाच्या सागरी नौकांची ढांडोळी
या वळणावरती माझ्या वाटांचे पाऊल थिजले
या वळणावरती माझ्या मौनाला अंकुर फुटले

फुलांची बाळं

रवींद्रनाथ टागोर यांची The Flower School हि कविता वाचली. या कवितेचा मी अनुवाद करावा इतकी माझी योग्यताही नाही आणि पात्रताही नाही…हवं तर असं म्हणेन कि त्यांची कविता मराठीतून मी हि अशी वाचली-

फुलांची बाळं

ढगांचा धुड्डुम धुड्डम आवाज येऊ लागलाय
पावसाळी वारा वेळूतून शीळ घालू लागलाय


आता फुलांची जणू जत्राच भरून जाईल
कुठून कुठून रंगीत रंगीत फुलं उगवुन येतील
आणि ही फुलं गारांच्या पावसात नाचतील, बागडतील
एकमेकांशी शिवाशिवी खेळतील

 
तुला माहितीये आई…
ही फुलं किनै शाळेत जातात
त्यांचीही एक शाळा असते, खोल खोल जमिनीच्या आत
ही फुलं वर्गाचं दार लावून गृहपाठ करतात
आणि मधल्या सुट्टीत लपाछपी खेळायला जातात


जेव्हा काळे काळे ढग येतात आणि पाऊस पडायला लागतो
तेव्हा परीक्षा-बिरीक्षा सगळं संपून फुलांना खूप मोठी सुट्टी लागते


मग सगळ्या फांद्या, सगळी पानं आणि आकाशातले ढगसुद्धा
सगळे सगळे खूप खूप खुश होतात
जोरजोरानि टाळ्या वाजवतात
मग ही फुलांची बाळं रंगीत झगे नि लाल-पिवळे सदरे घालून झाडांच्यावर सुट्टीला येतात


तुला माहितीये आई?
त्यांचं घर किनै असतं उंच आकाशात
चांदण्यांच्या घराजवळ
तू पाहिलं नाहीस का आई…किती गडबडीनं हि फुलं घरी पळून जातात
तुला नं आई माहितीच नाहीये फुलांची एक गंमत
आकाशात ना त्यांची पण असते एक आई
ती त्यांना रात्री कुशीत घेऊन थोपटते,
आणि गोष्टसुद्धा सनग्ते…आणि मग अंगाई गाते
जशी तू मला कुरवाळतेस आणि आणि माझे गालगुच्चे घेतेस ना…अग्गदी तस्सं!!!

Tuesday, 8 January 2013

प्रभूजी आणि लव लव करी पातं

गूढ किंवा कधी कधी दुर्बोध वाटणाऱ्या ग्रेसांच्या कविता. महानोर  मातीच्या, रानाच्या कवितांना चिकटलेले. मर्ढेकर शहरी, सामान्य माणसाच्या वाटेवरचे. शांताबाई सोशिक, प्रेमळ स्त्रीचा हात धरून चालणाऱ्या. बघायला गेलं तर प्रत्येक कवीची आणि त्याच्या काव्याची एक खासियत. पण जेव्हा आरती प्रभू हे नाव समोर येतं तेव्हा त्याला बसवण्यासाठी कुठला साचा सापडतच नाही. अनेक अंगांनी फुललेलं प्रभूंचं काव्य...त्याला अशी चिठ्ठी लावणं तसं जरा अवघडच. प्रभूंच्या कविता बऱ्याचदा अनेक कोनातून पाहता येतात. पुष्कळदा असं होतं की एकाच व्यक्तीला प्रभूंच्या एकाच कवितेचे अनेक रंग सापडतील. अगदी असंच माझंही झालं, जेव्हा "लव लव करी पातं..." कविता वाचली.

ही  कविता मला द्वयर्थी वाटते. कधी म्हातारपण जवळ आलेल्या बाईची व्यथा असलेली वाटते तर कधी तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अल्लड प्रेमिकेची वाटते. म्हातारपणात डोळ्याची पती लवू लागतात, इतकी की ताऱ्याची लुकलुक पण पाहू शकणार नाहीत. आयुष्यबद्दल फारशी आस्था उरलेली नसते...चव चव गेली सारी म्हणजे हेच..आयुष्यात सगळं भोगून झालं, आता कसलीच इच्छा उरली नाही. शरीरातही फारसा जोम, उत्साह राहिलेला नाही...हे किती वेगळ्या शब्दांत सांगितलंय...जोर नाही वाऱ्याला!

कुणी कुणी नाही आलं फड फड राव्याची
ऋणु झुणु हवा का ही गाय उभी दाव्याची

हे तर अगदीच खास कडवं...एक राव्याची फडफड सोडली तर कुणाचा मागमूसही नाही. पण वाटतं कुणीतरी येईल, आपली विचारपूस करेल. त्यामुळं साधी हवेची लकेर जरी आली तरी कान टवकारले जातात. दाव्याला बांधलेली गाय अशीच असते. गोठ्याच्या दारात जरी कुणी आलं तरी तिला पटकन कळंतं  आणि ती कानोसा घेते....तशीच ही अवस्था..कुणीतरी आलंय, कुणीतरी यावं असंच वाटतं...पण शरीराची गत अशी दाव्याला बांधल्याप्रमाणं!

तट तट करी चोळी तुट तुट गाठीची
उंबऱ्याशी जागी आहे पारुबाई साठीची

गाठीपाशी तुटलेली  चोळी कशी बेभरवशाची...त्याचप्रमाणं हे शरीर. या आयुष्याचा हा उंबरठा आहे...पारुबाई साठीची! साठीची हा शब्द उतारवायला रूपक म्हणून वापरला असावा. हा जीव कधी या थकलेल्या शरीराला सोडून जाईल याचा नेम नाही.

निवडुंग चित्रपटात हे गण दिसतं ते वेगळ्याच angle मधून. कदाचित हृदयनाथ मंगेशकरांना प्रभूंच्या कवितेची ही अशी दुसरी बाजू भावली असेल म्हणून त्यांनी त्याचं इतकं सुंदर आणि romantic गाणं बनवलं असावं. प्रेमात पडलेल्या मुलीच्या तोंडी आहे हे गाणं. पहिल्या अंतऱ्यात मनाची अस्वस्थता दिसते. मन इतकं सैरभैर झालंय की त्यावर अंकुश ठेवणं म्हणजे जणू पाऱ्याला मुठीत पकडण्याइतकं  कठीण होऊन बसलंय. प्रेमात तहान भूक सारं हरवून गेलंय. खरं तर कुणीच नाही आलं, नुसते राव्यानं पंख जरी फडफडवले, किंवा हवेची झुळूक जरी आली तरी 'तो' आल्याचा भास होतो. दाव्याची गाय जशी कानोसा घेते होते त्याप्रमाणं मन त्याची चाहूल लागते का याचा कानोसा घेतं.

उंबऱ्याशी जागी आहे पारुबाई साठीची या गाण्यातल्या वाक्यावर रवींद्र मंकणीच्या आईवर कॅमेरा फोकस होतो. जरा उंबरयावरच्या पारूबाईचं(स्वत:च्या आईचं) तरी भान ठेव असं सांगायचं असेल तिला कदाचित!!!




Wednesday, 19 December 2012

कतरा कतरा मिलती है...

मानवी जगणं हे कसं छोट्याछोट्या क्षणात अडकून पडलेलं असतं ना! आणि आपण मात्र मोठमोठ्या achievements च्या नादात हे जगणं कणाकणानं गोळा करायला विसरूनच जातो. गरम गरम चहाचा कडक प्याला, दोघांत एक करून खाल्लेलं वाफाळतं कणीस, पारिजातकाचा पहिला वाहिला बहर, आईच्या कुशीत घालवलेली रात्र, ग्रीष्मात surprisingly आलेली वळीवाची सर, कधी झोपेतून जाग आल्या आल्या कानावर पडलेला चिवचिवाट, आपल्या घरातलं छोट्या पिल्लानं टाकलेलं पहिलं पाऊल, नाकातोंडातून पाणी येत असलं तरी "भैय्या और तिखी बनाओ" असं म्हणत खाल्लेली पाणीपुरी, हिवाळ्याच्या एखाद्यापहाटेला पडलेलं गच्च आल्हाददायी धुकं, जुन्या फोटोंचे गठ्ठे काढून त्यांच्यात दिवस दिवसभर रमणं असे कित्ती कित्ती क्षण वाटेवर अगदी सहज भेटतात...आणि जगणं कणाकणानं भरून टाकतात.

अलीकडेच gallery मध्ये एक तुळशीचं रोपटं लावलंय. आणि तेही असंच रोज कणाकणानं आनंद देतंय. त्याला रोज पाणी घालणं, त्याला कुरवाळणं, त्याच्या मुळाशी माती मोकळी करणं या गोष्टीचं केवढं म्हणून अप्रूप! आता त्याला जेव्हा मंजिऱ्या फुटतील तेव्हा तर आम्ही दोघं  grand celebration च करणारे..

गुलझार म्हणतात ना,
              कतरा कतरा मिलती है, कतरा कतरा जीने दो,
              जिंदगी है, बेहने दो....बेहने दो.....

Friday, 14 December 2012

स्वातंत्र्यसैनिक

महाराष्ट्र शासनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवरील संशोधनपर बखरीमध्ये आमचे आजोबा आण्णा यांच्या कार्याचाही समावेश होत आहे. यामध्ये समाविष्ट करण्यासाठी पुढील मजकूर देण्यात येत आहे. आण्णांच्या कार्याचा अल्पपरीचय:

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यात १९४० च्या दशकात महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरीत होऊन अनेक तरुणांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. यांच्यात वयाने सर्वात लहान असणारे श्री. विष्णूपंत वासूदेव देशपांडे ऊर्फ आण्णा यांनीदेखील शाळकरी वयातच शिक्षण अर्धवट सोडून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली.
विष्णूपंत देशपांडे मूळचे कागल तालुक्यातील कसबा सांगावाचे. १९३७ साली त्यांनी वाय. सी. पाटील, नागनाथआण्णा नायकवडी व बाळू कुंभार यांच्या सहाय्याने क|| सांगाव येथील चावडीतील इंग्रज अधिकाऱ्यांना चकमा दिला व त्यांच्या ताब्यात असलेल्या बंदूका पळविल्या.
१९३८ सालच्या हुपरी डाक बंगला जळीत पार्क प्रकरणात आण्णांचा सहभाग राहिला. या प्रकरणात हुपरी येथील इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या बंगल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या समूहाने चहुबाजूंनी आग लावली होती. याच सुमारास १९३९ साली आण्णांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या एका तुकडीसोबत कोल्हापूरातील सरकारी खजिना लुटला व गारगोटीस पलायन केले.
पुढील काही वर्षात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्थापन केलेल्या प्रजा परीषद सहकारी चळवळीत अण्णांचा सक्रीय सहभाग राहिला. पुढे जाऊन अण्णांनी कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेस सेवादल युवक संघटनेचे प्रमुखपद सांभाळले. या संघटनेतर्फे अण्णांनी अनेक तरुणांना हाताशी घेऊन खेडोपाडी जाऊन प्रभातफेऱ्या काढल्या. स्वदेशी मालाचा प्रचार केला. जातीभेद व अस्पृश्यता यांच्याविरोधात जनजागृती केली. आण्णांनी आमरण खादीचे कपडे वापरले. तसेच चहा, कॉफी आणि परदेशी मालाचा आयुष्यभर त्याग केला.
१९४० साली हुपरी जाळीत पार्क प्रकरणी अण्णांना इंग्रज सरकारने अटक केली. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालविण्यात आला. खटला सुनावणी दरम्यान आण्णांना कोल्हापूर येथील बिंदू चौक तुरुंगात ११ महिने सध्या कैदेची शिक्षा भोगावी लागली. खटल्याच्या निकालाअंती इंग्रज सरकारने त्यांना साडे सात वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यानंतरच त्यांची सुटका झाली.
१९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपट प्रदान करून अण्णांचा गौरव करण्यात आला. याव्यतिरिक्त महाराष्ट्र शासन तसेच कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे सन्मानपत्र देऊन अण्णांना गौरविण्यात आले.

Tuesday, 11 December 2012

...उगीचच!!!

एक विचारू? एक सांगशील?
उगीच रहायचं प्रश्नांची जाळी विणत
आणि उगीचच करायच्या शब्दांच्या कसरती
खरं तर सगळी उत्तरं आधीच डोळ्यातून झिरपयाची...
उगीच खेळायचे प्रश्नोत्तरांचे डाव
शब्दांना उगीचच लावायचे विरामचिन्हांचे टेकू
आणि उगीचच माहित असलेल्या प्रश्नांची माहित असलेली उत्तरं
फिरून फिरून घोळवायची...

उगीच घालायचा एकमेकांभोवती पिंगा
आणि उगीचच धरायचा हातामध्ये हात
उगीच लावायचा जीव, उगीच घालायचे वाद
उगीच चिडणे, उगीच रुसणे
आणि उगीचच पोकळ स्वप्नांची रात्र जागून जागून जगायची...

आपले सगळे प्रश्न
आणि आपलीच ती उत्तरं उगीचच गेली विरून...
आपले ते वाद
आणि आपलीच ती स्वप्नं उगीचच गेली सरून...
आपलेच ते शब्द
आणि आपलीच ती विरामचिन्हं उगीचच गेली गळून...
...उगीचच!!!
....................................................................................................................प्रतिमा

Tuesday, 4 September 2012

अरे खोप्यामधी खोपा

श्रावणात कोल्हापूरला घरी गेले होते तेव्हा माझ्या आवडीच्या बुलबुल पक्ष्यांनी एका रात्रीत आम्हाला सगळ्यांनाच एक "सरप्राईज" दिलं. धुणं वाळत घालायच्या दोरीवर अवघ्या चोवीस तासांत बुलबुल पक्ष्याच्या जोडीनं आपल्या पिलासाठी एक सुंदर घरटं बांधलं होतं.



घरटं जरी सुगरणीचं नसलं तरी बहिणाबाईंची कविता आठवली...

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
पहा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजती खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाला टांगला

खोपा विणला विणला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा बघ रे माणसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं
                                          दोन हात, दहा बोटं

Thursday, 30 August 2012

एक किस्सा आहे...

एक निवांत दुपार आणि समोर फरहान अख्तर ची कविता...
"जिंदगी मिलेगी ना दोबारा"  या चित्रपटातील एका कवितेचा स्वैर अनुवाद


एक किस्सा जो ओठांवर येता येता थांबतो
फक्त डोळ्यांआडून डोकावत राहतो
कधी तुला, कधी मला
शब्दांचा दान मागत राहतो
ज्या शब्दांसोबत ओठांवर येईल तो
आणि मग स्वरांना पकडून झोकेही घेईल तो

पण हा जो काही किस्सा आहे
कुठल्याश्या जाणीवेची जाणीव आहे
वातावरणात तंरंगणाऱ्या सुगंधाची
सुगंध...अबोल अबोल सुगंध
हा सुगंध तुझ्याही ओळखीचा
आणि माझ्याही परिचयाचा
सगळ्या जमान्याला माहितीचा झालेला

मनात गुंतून राहिलेलं हे कसलं बरं गुज आहे???

Tuesday, 24 July 2012

फक्त एकच गोष्ट...

फक्त एकच गोष्ट...
फक्त एक गोष्ट दोन इवल्या डोळ्यांची...
काही घनांच्या वेली,
काही थेंबाच्या सरी,
आणि फक्त एकच गोष्ट दोन ओल्या डोळ्यांची...

मेघातून बरसणाऱ्या सरी होऊन,
कधी दरीतून वाहणारी नदी होऊन,
कधी ऐकणाऱ्यासाठी,
कधी न ऐकणाऱ्यासाठी,
कधी व्यक्त होऊन,
कधी अव्यक्तपणे,
मी सांगतच राहीन फक्त एकच गोष्ट,
फक्त एकच गोष्ट...दोन ओल्या डोळ्यांची..

थोडी ओळखीची झालेली,
आणि थोडी अनोळखी राहिलेली,
जिथं थांबतील अश्रू,
तिथेच संपून गेलेली,
अगदी नवी कोरी असूनही
फिरून पुन्हा जुनीच वाटलेली,
फक्त एकच गोष्ट...दोन ओल्या डोळ्यांची..

ओसरलेल्या आठवणी,
पुन्हा जाग्या होतील,
ओठांवरती पुन्हा एकदा,
तेच शब्द उभे राहतील,
एकच अशी गोष्ट दोन खोल डोहांची,
आणि फक्त एकच गोष्ट...दोन ओल्या डोळ्यांची..

....................................प्रतिमा


गुलजार, आऱ्.डी. आणि आरती मुखर्जी या तिघांच्या परिश्रमाचं सुंदर फळ म्हणजे 'मासूम' चित्रपटातील "दो नैना और इक कहानी" हे गाणं. याच गाण्याचा स्वैर अनुवाद, "फक्त एकच गोष्ट..."
खरं तर गुलजारांच्या शब्दांचा अनुवाद करण्याची माझी कुवतही नाही. पण एक छोटासा प्रयत्न....

Monday, 2 July 2012

विरहचक्र

सांज कातर कातर,
सांज एक हूरहूर,
सांज आठव आठव,
सांज नि:शब्दाचा स्वर,
सांज मौनाचेच बोल, सांज शांततेचा रव,
विरहाच्या पावलांनी सांज ओसरते...

रात स्वप्नांचेच घर,
रात श्वास अलवार,
रात अश्रुंचीही सखी,
जोजवाते हळूवार,
आशेच्या धुक्यात, पापण्यांच्या दुलईत,
लाख चांदण्यांच्या गावी रात पाझरते...

दिस एक गजबज,
दिस गर्दीत एकला,
माणसांच्या जंगलात,
दिस शोधतो कुणाला?
सैरभैर जीवा,वेडी लावुनिया आस,
पुन्हा सांजेच्याच पोटी दिस मावळतो...

..............Pratima

Monday, 25 June 2012

कधीतरी...

कधीतरी एखाद्या दिवशी,
त्या खोलीचा दरवाजा चुकून उघडला जातो,
आणि कसं काय माहित नाही,
आठवणींचा छोटासा झरा, पूर आल्याप्रमाणं गावभर पसरतो...

या आठवणी पण कशा, मुलुखाच्या व्रात्य,
मिळालं रिकामं मन, म्हणून करत राहतात दंगा,
झोंबाझोंबी करतात, अंदाधुंदी माजवतात,
आणि गरीब बिचाऱ्या मनाभोवती घालत राहतात पिंगा...

पण काही असतात अगदीच गुणी,
गोंजारतील, कुरवाळतील,
कुठं लचकलं, मुरगळलं असेल तिथं मलमसुद्धा लावतील,
आणि काही काही खुपच खटयाळ,
रडवतील, चिडवतील,
कुठं खरचटलं बिरचटलं असेल तिथं मुद्दाम नखानं ओरबाडतील...

काही काही असतात अगदी मस्त कलंदर,
कधी विदुषकाप्रमाणं खेळ करून,
गालावर हळूच हसू आणतील...
किंवा कदाचित भावनांचा मेळ जमवून,
हळूच डोळे ओले करतील...

मग अचानक कुठूनतरी एक बागुलबुवा येतो,
या सगळ्या लेकीबाळींना खूप खूप दटावतो,
काही लपून बसतात कुठतरी अडगळीत,
काही काही झोपी गेल्याचं नाटक पार पडतात सुरळीत,
काही निघून जातात परत बंद खोलीत,
काही मात्र फिदीफिदी हसत राहतात,
बागुलबुवाचे शब्द झेलीत...

मग तो बागुलबुवा अनेक खटपटी करून
त्यांना पुन्हा खोलीत ढकलतो,
कड्या, कोयंडे, कुलुपं लावून,
खोली गच्च बंद करतो...

पण कसं काय माहीत नाही,
एखाद्या दिवशी खोलीचा दरवाजा चुकून उघडला जातोच...

.........Pratima