काय मंडळी कसे आहात? मला आशा आहे की सहज सोपी अन्नपूर्णा हे सदर तुम्हाला आवडत असेल.
श्रावण महिन्यापासून सुरू होणारे सणवार आणि त्यासाठी होणारा नैवेद्याचा स्वयंपाक हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. चटण्या, कोशिंबीरी, भाज्या, निरनिराळ्या प्रकारच्या आमट्या, वेगवेगळे भाताचे प्रकार करून संग्रसंगीत नैवेद्याचे ताट "इदम् न मम" असं म्हणून देवबाप्पापुढे ठेवण्यात एक वेगळीच धन्यता असते.
आज मी याच नैवेद्याला, किंवा रोजच्याच नेहमीच्या स्वयंपाकात लज्जत आणणारी एक चटणी घेऊन आले आहे, चला तर मग पटापट पाहूया, कशी करायची गवारीच्या शेंगांची चटणी...
साहित्य:
- अर्धी वाटी निवडलेल्या गवारीच्या शेंगा
- १-२ मिरच्या, तिखटपणानुसार
- लसूण ३-४ कुड्या (नेवैद्याच्या स्वयंपाकात लसूण नाही घातला तरी चालेल)
- कोथिंबीर
- ओवा
- जिरे
- मीठ चवीनुसार
- तेल चमचाभर
- साखर चिमूटभर
- दही
कृती:
एका लोखंडी तव्यात, किंवा कढईत तेल घालून त्यात जिरे, ओवा, ठेचलेला लसूण, मग मिरचीचे तुकडे असे एकामागून एक घालावे. मग गवारीच्या शेंगा घालून कच्चट वास जाईपर्यंत मंद आचेवर छान परतून घ्यावे.
हे मिश्रण थोडं थंड झालं की त्यात कोथिंबीर, मीठ, साखर, चमचाभर दही असे घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
झाली तय्यार गवारीची चटणी.
तुम्ही ही चटणी बिन लसणाची करून नेवैद्यावर घालू शकता. भाकरी, पोळी किंवा अगदी ब्रेडसोबतदेखील खाण्याची लज्जत वाढवणारी, चटपटीत, आणि झटपट होणारी गवारीची चटणी नक्की करून पहा.
आणि कंमेंट करून सांगा पटापट, अवडतेय का 😊
It tastes very good.
ReplyDeleteNice
ReplyDelete