Thursday, 23 July 2020

सहज सोपी अन्नपूर्णा - भाग ३ - तांदूळ पिठीची उकडशेव

कधी कधी नेहमीच्या पोहे, उपमा अशा न्याहारीचा जाम कंटाळा येतो. किंवा कधी संध्याकाळी  चारच्या भुकेला मस्त गरमा गरम काही खायचं असतं. पण उपलब्ध साधनांची कमतरता, किंवा वाढलेलं वजन, किंवा कधी  अजून काही, यामुळे ऑप्शनला असलेले पदार्थ काही उरतच नाहीत. काय? होतं ना तुमचंही असं? मग नक्की करून पहा तांदूळ पिठीची उकडशेव.

साहित्य: (चार माणसांसाठी)

४ वाट्या तांदळाचे पीठ
१ वाटी आंबट ताक
लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण २-३ चमचे
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी तेल, जिरे, आणि तीळ

कृती:

एका भांड्यात तांदळाचं पीठ, मीठ, कोथिंबीर-लसणाचं वाटण एकत्र करावं, आणि त्यात ताक घालून घट्ट मळून घ्यावं. गरज लागल्यास थोडं पाणी घालावं. ताक जास्त आंबट नसेल तरी हरकत नाही.


मळलेला गोळा चकली यंत्रात घालून त्याची शेव पाडावी आणि उकडून घ्यावी. आमच्याकडे ५-६ जण असल्यामुळे मी इडली पात्रात उकडून घेते. तुमच्याकडे मोदक उकडायची जी यंत्रणा असेल त्यातही उकड काढली तरी चालेल.


उकडलेली शेव ताटलीत घालून वरती मस्त खमंग तीळ, जिऱ्याची फोडणी घालून खायला घ्या.
पैजेवर सांगते, पोरा-टोरांना तर आवडेलच पण मोठेही खुश होतील.
मग आता झटपट झटपट तयारीला लागा आणि बनवून पहा उकडशेव. आणि हो, कशी झालीये हे सांगायला विसरू नका.


#सहज_सोपी_अन्नपूर्णा

Wednesday, 22 July 2020

सहज सोपी अन्नपूर्णा - भाग २ - डांगर

लॉकडाऊन असू दे किंवा नसू दे, भाजी किंवा कोशिंबीर कोणती करावी हा स्वयंपाकघरात शिजणारा पहिला प्रश्न असतो. कधी मोठ्या सुट्टीवरून परत घरी आल्यावर, किंवा घरी विशेष भाजीपाला नसेल अशावेळी तर हा प्रश्न हमखास पडतोच.

अशा खिंडीत गाठणाऱ्या प्रश्नाला चोख आणि पौष्टिक उत्तर म्हणजे डांगर. चला तर मग पाहू...भाकरी असो किंवा पोळी यांच्याशी छान गट्टी करणारे डांगर..!!

साहित्य:
१ वाटी धुवून वाळवलेली उडदाची डाळ
जिरे, धणे - प्रत्येकी ३-४ छोटे चमचे

कृती:
एका जाड बुडाच्या कढईमध्ये उडीद मंद आचेवर भाजून घ्यावेत. बाहेर हॉल मधून "कसला खमंग वास येतोय" अशी विचारणा झाली म्हणजे उडीद भाजून झाले असं समजा. मग त्याच कढईत धणे आणि जिरे भाजून घ्या. हे सगळं थंड झालं की मिक्सर मधून एकदम छान बारीक पूड करून घ्या. आणि ही पूड बरणीत भरून ठेवा. फ्रिजबाहेरदेखील अनेक दिवस (१-२ महिने तरी, किंवा जास्तच) टिकते.

काय?? आहे किनई सोप्पी कृती. अत्यंत कमी सामग्री, अत्यंत कमी प्रक्रिया(प्रोसेससिंग) केलेले पदार्थ हीच आपल्या या सदराची खासियत आहे. आता सांगते हे खायचं कसं.

ज्या ज्या वेळी भाजी किंवा कोशिंबीर काय हा प्रश्न येतो तेव्हा सॉस वगैरे खाण्यापेक्षा तुम्ही खाऊ शकता डांगर. आपण बनवलेलं डांगर २-३ चमचे घ्या, त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घाला. मस्त चुरचुरीत मोहरी, कढीपत्ता, आणि भरपूर हिंगाची फोडणी द्या. असेल तर एखादी भरली मिरची किंवा सुकी लाल मिरची तळून, चुरून टाका. चवीनुसार मीठ घालून आणि थोडंसं दही घालून मिसळा. झालं मग खमंग आणि पौष्टिक डांगर तय्यार.

बनवा पटापट, आणि सांगा कसा होतोय बेत.
माहितीये का, डांगर भाकरी दे नाहीतर विंचू चावेल..!!