Tuesday 31 July 2012

नभ मेघांनी आक्रमिले...

एका थंडगार संध्याकाळी आभाळ दाटून आलं होतं. बुडणारा सूर्य आणि आभाळात होणारी ढगांची गर्दी, मग पुन्हा  वाऱ्यामुळे विरळ होणारे ढग असा खेळ चालू होता. हा आभाळाचा कॅनव्हास कॅमेऱ्याच्या कॅनव्हासवर उतरवून घेताना खूप मजा आली.





EXIF Data:

Dimension: 4288 x 3216
Camera: Kodak EasyShare z981
Exposure Program: Manual
Orientation: Noramal
Flash: Not Used
Focal Length: 25.7mm
Exposure Time: 0.0125s (1/80)
Aperture: 4.5
ISO: 1600
Color Space: RGB

Sunday 29 July 2012

हास्या - २

एका सुंदर सकाळी पुन्हा एकदा एक हास्या दिसावी आणि ती अशी अलगद प्रकाशचित्रात साठवता यावी यासारखं दुसरं समाधान कशात नाही...

आमच्या शेजारी दोन दिवस पाहुणी म्हणून आलेली ही अजून एक हास्या...


Tuesday 24 July 2012

फक्त एकच गोष्ट...

फक्त एकच गोष्ट...
फक्त एक गोष्ट दोन इवल्या डोळ्यांची...
काही घनांच्या वेली,
काही थेंबाच्या सरी,
आणि फक्त एकच गोष्ट दोन ओल्या डोळ्यांची...

मेघातून बरसणाऱ्या सरी होऊन,
कधी दरीतून वाहणारी नदी होऊन,
कधी ऐकणाऱ्यासाठी,
कधी न ऐकणाऱ्यासाठी,
कधी व्यक्त होऊन,
कधी अव्यक्तपणे,
मी सांगतच राहीन फक्त एकच गोष्ट,
फक्त एकच गोष्ट...दोन ओल्या डोळ्यांची..

थोडी ओळखीची झालेली,
आणि थोडी अनोळखी राहिलेली,
जिथं थांबतील अश्रू,
तिथेच संपून गेलेली,
अगदी नवी कोरी असूनही
फिरून पुन्हा जुनीच वाटलेली,
फक्त एकच गोष्ट...दोन ओल्या डोळ्यांची..

ओसरलेल्या आठवणी,
पुन्हा जाग्या होतील,
ओठांवरती पुन्हा एकदा,
तेच शब्द उभे राहतील,
एकच अशी गोष्ट दोन खोल डोहांची,
आणि फक्त एकच गोष्ट...दोन ओल्या डोळ्यांची..

....................................प्रतिमा


गुलजार, आऱ्.डी. आणि आरती मुखर्जी या तिघांच्या परिश्रमाचं सुंदर फळ म्हणजे 'मासूम' चित्रपटातील "दो नैना और इक कहानी" हे गाणं. याच गाण्याचा स्वैर अनुवाद, "फक्त एकच गोष्ट..."
खरं तर गुलजारांच्या शब्दांचा अनुवाद करण्याची माझी कुवतही नाही. पण एक छोटासा प्रयत्न....

Monday 2 July 2012

विरहचक्र

सांज कातर कातर,
सांज एक हूरहूर,
सांज आठव आठव,
सांज नि:शब्दाचा स्वर,
सांज मौनाचेच बोल, सांज शांततेचा रव,
विरहाच्या पावलांनी सांज ओसरते...

रात स्वप्नांचेच घर,
रात श्वास अलवार,
रात अश्रुंचीही सखी,
जोजवाते हळूवार,
आशेच्या धुक्यात, पापण्यांच्या दुलईत,
लाख चांदण्यांच्या गावी रात पाझरते...

दिस एक गजबज,
दिस गर्दीत एकला,
माणसांच्या जंगलात,
दिस शोधतो कुणाला?
सैरभैर जीवा,वेडी लावुनिया आस,
पुन्हा सांजेच्याच पोटी दिस मावळतो...

..............Pratima