Wednesday 12 July 2017

डोंगर चढुया नेटाने...!

(मैत्रिणीच्या आग्रहावरून एक जुनीच इंग्रजी पोस्ट मराठीतून रेपोस्टत आहे)

ऑक्टोबर महिना, साल २०११
"या वीकएंडला स्कंदागिरीला जायचं का?", संध्यकाळी जेवताना आमच्यातल्या कुणीतरी टूम काढली. आमची चेन्नईहून बेंगलोरला बदली होऊन जवळ जवळ तीन महिने उलटून गेले होते. आम्हाला सगळ्यांनाच स्कंदगिरीला जाण्याची खूप इच्छा होती, त्यामुळे आम्ही लगेचच जाण्याचा निर्णय घेतला. आमच्या काही उत्साही मैत्रिणींनी ट्रेकिंगसाठी वेगळी खरेदी पण केली.

कर्नाटकच्या चिकबळ्ळापूर जिल्ह्यात वसलेल्या स्कंदागिरीला "कलवरा दुर्ग" म्हणूनही ओळखले जाते. बेंगलोर - हैद्राबाद रोड अर्थातच राष्ट्रीय महामार्ग ७ वर बेंगलोरपासून ७० किलोमीटर अंतरावर स्कंदगिरी पर्वत आहे. स्कंदागिरीचे शिखर अंदाजे १४०० मीटर उंचीवर आहे. बेंगलोर आणि आसपासच्या परिसरात ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांचे हे फेव्हरेट डेस्टिनेशन आहे.

आम्हाला स्कंदागिरीला जाणाऱ्या बसेसबद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे आठ लोक बसतील अशी एखादी गाडी भाड्याने ठरवून जायचं आम्ही पक्कं केलं. पहिल्या १५० किलोमीटरसाठी २४०० रु. आणि नंतर प्रति किलोमीटर ९.५० रु. या दराने आम्ही एक इनोव्हा गाडी ठरवून निघालो.

रविवारी सकाळी ४ वाजताच आम्ही प्रवासाला सुरुवात केली. बाहेरचं वातावरण अतिशय थंड होतं. दोन अडीच तासात आम्ही स्कंदगिरीच्या पायथ्याशी पोचलो. आम्ही येताना गाडीमध्येच सोबत घेतलेला नाष्टा केला होता. त्यामुळे सगळेजण आता ट्रेक करण्यासाठी पूर्ण सज्ज होतो. आमच्या प्रत्येकाच्या सॅकमध्ये एक-दिड लिटरच्या पाण्याच्या बाटल्या, फळे, ग्लुकोज बिस्किटे आणि इतर बारीक सारीक सामान होतं. आमच्या "ट्रिप"ला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.

आम्ही ट्रेकिंगसाठी जी वाट निवडली होती ती फारच दुर्गम होती. सामान्यतः या वाटेने कुणीच जात नाही (गमतीची गोष्ट अशी कि हे आम्हाला शिखरावर पोहोचल्यावर समजलं)
पावसाळा संपून गेल्याने वाटेतल्या खडकांवरचं शेवाळं पूर्ण वाळून गेलं होतं. त्यामुळे मातीच्या रस्त्यावरून जाण्यापेक्षा खडकांवरून वर चढणं तुलनेनं सोपं होतं. प्रयत्न करत करत आम्ही छोट्या मोठ्या कातळांवरून पुढे जात होतो. वाटेवर खडकांत खोलवर घट्ट रुजलेलं गवत भरपूर वाढलं होतं. या गवताच्या आधाराने खालच्या खडकावरून वरच्या खडकावर जाणं शक्य होत होतं. वर चढताना पूर्ण वेळ आम्ही एकमेकांच्या सोबतीलाच होतो. जर एखाद्याला चढताना अडचण वाटली तर इतर कुणीतरी त्याला वर यायला मदत करत होतं. वर चढताना हाताचे तळवे खरचटून निघत होते. पण कड्यावरती पोचण्याच्या ध्येयापोटी या सगळ्याचा विसर पडला होता. आणि याच नादात अगदी मजेत आमची घौडदौड सुरु होती.

खडकांवरून वर चढणं जितकं कठीण होतं तितकंच रोमांचक आणि आनंददायीदेखील होतं. गाणी म्हणत, एकमेकांची टिंगल टवाळी करत, प्रसंगी थकलेल्यांना प्रोत्साहन देत, वेळ आणि चांगली जागा मिळेल तसे फोटो काढत आमचं डोंगर चढणं सुरु होतं. एव्हाना सूर्योदय होऊन उन्हं वर आली होती. तापमानात वाढ होईल तसं चढणं कठीण होत होतं. सगळ्यांनाच बऱ्यापैकी तहान आणि भूक लागली होती. सकाळी केलेला नाष्टा कुठच्या कुठे गुल झाला होता. पण खूप जास्त पाणी पिल्याने किंवा खाल्ल्याने शरीर जडावलं असतं आणि वर चढणं अजून जिकिरीचं झालं असतं. त्यामुळे पाचेक मिनिटांची विश्रांती घेऊन, गरजेपुरतं थोडंसंच खाऊन आम्ही पुन्हा चढती सुरु केली.




अखेर दोन तासांच्या अथक चढाईनंतर आम्ही स्कंदाबेट्टाच्या शिखरावर पोचलो होतो. अंदाजे ४६०० फूट उंचीवर पोचल्यानंतर दिसणारं दृश्य थक्क करणारं होतं. वरती निळंशार आभाळ, त्यात मजेत झुलणारे ढगांचे पुंजके, दूरवरून येत आणखी दूरवर जाणारा पक्षांचा थवा असा देखावा.. तर खाली पायथ्याशी दिसणारी इवली इवली घरं, अधेमध्ये चकाकणारे पाणवठे, हिरव्या रानांतून जाणारे तपकिरी रस्ते, मधूनच कुठेतरी संथपणे हलणारा गुरांचा कळप असा नजारा ! हे सारं डोळ्यांत साठवावं तितकं कमी ! जमिनीपासून इतक्या उंचीवर सोसाट्याचा वारा होता. या वाऱ्यामुळे, तिथल्या विलक्षण शांततेमुळे आणि आजूबाजूला दिसणाऱ्या लोभस सृष्टीमुळे वर येताना झालेल्या सर्व कष्टाचा विसर पडला. इतक्या उंचीवर पोचूनदेखील निसर्गाचे सारे अविष्कार पाहून आपण त्याच्यापुढे किती ठेंगणे आहोत याची जाणीव होत होती.

वरती पोहोचल्यावर मला फोटो काढायला अजून उधाण चढलं. मी सगळ्यांचे आनंदी आणि विजयी चेहरे केमेऱ्यात बंदिस्त करून घेत होते. मग सगळ्या बाजूंनी पायथ्याशी दिसणारे नजारे न्याहाळले. एव्हाना आमचं भारावलेपण बऱ्यापैकी कमी होऊन तहान आणि भुकेच्या जाणीवेनं मनाचा ताबा घेतला होता. वर शिखरावर आम्हाला मॅगी, अंड्याचे ऑम्लेट आणि थंड पाण्याच्या बाटल्या विकणारे काही स्थानिक लोक भेटले. हे लोक रोज इतक्या उंच चढून येऊन या गोष्टी विकतात. यातली प्रत्येक गोष्ट ५० रु.ला होती. फक्त शनिवार-रविवार दोनच दिवस या लोकांचा हा उद्योग जोमाने चालतो. म्हणून आम्हीही अजिबात घासाघीस ना करता त्यांच्याकडून पाण्याच्या काही बाटल्या आणि गरमा गरम मॅगी घेतली. (अर्थात त्यांच्याकडून खाणं घेण्याशिवाय आम्हाला इतर पर्यायही नव्हता ही बाब वेगळी !!)

मॅगीवर यथेच्छ ताव मारून झाल्यावर अर्ध्या एक तासाने आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. यावेळेस आम्ही दुसरा रस्ता निवडला होता. उतरणीचा मार्ग तुलनेने खूपच सोपा होता. पाऊणेक तासात आम्ही पायथ्याशी पोचलो. होस्टेलवर पोचेपर्यंत सगळ्यांच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या होत्या. तासभर आम्ही आळीपाळीने गरम पाण्याच्या बादलीत पाय बुडवून बसलो. थोड्या वेळाने होस्टेलच्या आंटीचा स्वयंपाक तयार झाला. आम्ही पेंगत पेंगतच सारू अण्णा खाऊन घेतला. आणि रविवार असूनदेखील नवाच्या ठोक्याला झोपी गेलो.



Road map


View Larger Map


ट्रेकिंगमधल्या नवख्या लोकांना या ट्रेकच्या निमित्ताने काही गोष्टी सांगाव्याशा वाटतायेत. ट्रेकिंग ही सहसा एकट्याने करण्याची गोष्ट नाही, विशेषतः तुम्ही अननुभवी असताना तर नाहीच नाही! शिवाय ५ ते ६ किंवा त्याहून अधिक जणांनी एकत्र केलेल्या ट्रेकिंगमध्ये एक वेगळीच मजाही असते. ट्रेकिंग करताना नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहणे इष्ट. जोडप्यांनी अथवा एकदोघांच्या गटाने संपूर्ण गटापासून अलिप्तपणे जाणे टाळावे. खूप उंचीवर मोबाईल फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर जातात. त्यामुळे सतत एकेमकांच्या संपर्कात असणे अतिशय महत्वाचे असते. ट्रेकिंग करताना स्पर्धा करणे प्रकर्षाने टाळा. दुर्बल सदस्यांना मागे ठेऊन पुढे जाऊ नका. जागेच्या नकाशाची पुरेशी माहिती स्वतःजवळ असू द्या. (या बाबतीतही मोबाईल फोनवर अवलंबून राहणे तितकेसे योग्य नाही). दिशादर्शक सोबत असेल तर उत्तम. आपत्कालीन स्थितीचा सामना करता यावा म्हणून प्रथमोपचाराचे साहित्य आणि माफक औषधे नेहमी बरोबर ठेवावीत. खूप अवघड रस्ता असल्यास ट्रेकिंगची आधुनिक साधनेही सोबत ठेवावीत.

प्रत्येकाने स्वतःजवळ पुरेसे खाद्यपदार्थ आणि पाणी ठेवावे. हे अन्न शरीराला जडत्व देणारे नसावे. शरीराला त्वरित ऊर्जा देणाऱ्या गोष्टी (जसं कि लिंबू सरबत, संत्री, कलिंगड आणि तत्सम पाणीदार फळे, काकड्या इ.) सोबत घ्याव्यात. ग्लुकॉन-डी किंवा कार्बन डायऑक्साईड विरहित सरबते सोबत घेण्यासही हरकत नाही. शक्यतो कोकम सरबत, पन्हे अशा नैसर्गिक सरबतांना प्राधान्य द्यावे. अगदीच गरज लागली तर असावा म्हणून ग्लुकोज बिस्किटाचा एखादा पुडा जवळ घ्यावा. पण एक किंवा दोन बिस्किटे खाऊन थांबणे आवश्यक आहे. ब्रेड, चिप्स असे जड पदार्थ खाणे टाळावे. खारट पदार्थ खाणे किंवा फळांना मीठ लावून खाणे टाळावे, जेणेकरून जास्त तहान लागणार नाही. चढण्यापूर्वी स्थानिक लोकांकडून पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांबद्दल माहिती करून घ्यावी.

ट्रेकिंग करताना आपला पोशाख ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जमीनीवर उत्तम पकड घेणारे बूट घालणे अत्यावश्यक आहे. चढताना अथवा उतरताना अडथळा होणार नाही असे कपडे परिधान करावेत. कपडे खूप घट्ट किंवा खूप सैल, घेरदार, किंवा काट्याकुट्यात अडकतील असे नसावेत.

ट्रेकला जाण्यापूर्वी पंधराएक दिवस अनुलोम-विलोम किंवा भस्त्रिका असे प्राणायाम नियमितपणे केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. खूप जास्त उंचीवर सहसा ऑक्सिजनची कमतरता असते. अशा वेळी श्वसनाच्या नियमनाचा सराव असलेल्या व्यक्तींना ट्रेकिंग करणे सोपे जाते. नियमितपणे व्यायाम करणाऱ्यांनाही ट्रेकिंगसाठी वेगळी शारीरिक तयारी करावी लागत नाही.

दिवस आहेत पावसाळ्याचे,
सह्यकड्यांना न्यहाळायचे... 
ट्रेकिंगसाठी  तुमची बॅग 
कधी करताय सांगा पॅक?

Monday 10 July 2017

शाश्वत

वठलेल्या पिंपळाला चैत्राची पालवी फुटावी तसं झालंय,
माझ्याच मस्तकातुन इवली दोन पानं उगवावीत जणू, जुळलेल्या ओंजळीगत...

आपल्यात नव्यानं उभं राहू पाहणारं हे शाश्वत नातं असेलच नेहमी,
तुझ्या-माझ्या रक्ताइतकं प्रवाही

बदलतील त्याची वळणं,
कमी जास्त होईल त्यातला आवेग आणि जवळीक,
किंवा नेहमीच त्याची गुंफण राहील अगदी घट्ट...
सोसावे लागतील त्याला ऊन-पावसाचे खेळ,
आणि क्वचित ताटातुटीची ससेहोलपट...

आपल्यात रुजलेल्या नात्याला
कशाला द्यायचं काही नाव,
आणि का करायचा अट्टाहास, त्याची व्याख्या शोधण्याचा,
बाभळीसारखं काटेरी असू देत अथवा कदंबसारखं हिरवंकंच,
हे नातं आहे अगदी शाश्वत नि खरं
असु देत वाईट, किंवा बरं,
पण लक्षात ठेव,
हे नातं आहे, अगदी खरं,
तुला मला जोडणाऱ्या नाळेइतकं खरं !!

घर


मे महिना, साल २०१३
नुकताच साखरपुडा झालेला आणि नवीन आयुष्य सुरु करण्याची हुरहूर, उत्सुकता, कणभर भीती असं काही काही मनात सुरु होतं. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला बदली करून घ्यायची आणि दुसऱ्या आठवड्यात असेलल्या लग्नाच्या सुट्टीवर जायचं असं ठरलं. लग्न झाल्यावर मुंबईच्या नवीन घरी नव्या नव्या संसाराची स्वप्नं पाहताना असतानाच अचानक ऑफिसमधून वेगळीच बातमी समजली आणि आपण केलेला बेत तडीस जाणार नाही हे समजलं.

पुण्यातल्या ऑफिसमध्ये फक्त एका महिन्यासाठी मला काम देता येणार नव्हतं. त्यामुळे एकतर पुढचं पूर्ण वर्ष पुण्यात राहा किंवा आत्ता लगेच मे महिन्यातच मुंबईला जा असं सांगण्यात आलं. अर्थातच दुसरा पर्याय निवडण्याशिवाय काही उपाय नव्हता. त्यामुळे एखादं घर भाड्याने घेऊन तिथे मी एकटीने राहायचं, आणि लग्नानंतर अमृतने सोबत राहायला यायचं असं ठरलं.

दरम्यानच्या काळात मी कोल्हापूरला असताना व्हॅट्सऍप वरून घरांच्या फोटोंची देवाण घेवाण झाली. आणि आम्ही विक्रोळीमधील एक घर निश्चित केलं. घराचा भाडे करार ज्या दिवशी करायचा होता त्याच दिवशी मी मुंबईला गेले. पहिल्याच दिवशी भावी नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे ठाणे ते विक्रोळी असा लोकल प्रवास करून विक्रोळी आणि तिथून पुढे रिक्षाने पवईचं ऑफिस गाठलं. पहिलाच दिवस ऑफिसमध्ये नवीन सहकाऱ्यांशी ओळखी करून घेणे, नवीन कामाची माहिती घेणे, ऑफिसची बिल्डिंग फिरून पाहणे यात गेला. आणि अर्थातच फोटोमधलं घर खरं खुरं कसं असेल याच्या कल्पनेत गेला.

संध्याकाळी मी रिक्षाने विक्रोळीला गेले. घराचा भाडे करार व्यवस्थित पार पडला. घर तसं सुंदर होतं, पण घराला नुकताच लावलेला रंग आणि धूळ जागोजागी यथेच्छ पसरले होते. घरात ओटा आणि एक पोटमाळा वगळता एखादं भिंतीतील कपाट किंवा रॅक असं काहीच नव्हतं. फक्त एक बॅग भरून सामान घेऊन आलेल्या मला एकदमच सुनं सुनं वाटायला लागलं.  बाजूलाच पडलेला एक बॉक्स घेऊन  मी त्यावर माझी लालबुंद ओढणी अंथरली, आणि बॅगेतली गणपतीची गणपतीची मूर्ती त्यावर ठेवली. बॅगेतुन एक छोटा दिवा आणायलाही मी विसरले नव्हते पण तेल आणि काडेपेटी नसल्यामुळे तो लावणं शक्य नव्हतं. आम्ही दोघांनी गणरायाला मनापासून नमस्कार केला आणि आमच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद मागितले. सोबत आणलेल्या इलेक्ट्रिक शेगडीवर मी भात केला आणि आणि आम्ही पोटभर मेतकूट भात खाल्ला.

दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून डोळे उघडल्यावर मला जास्तच एकटं एकटं वाटू लागलं. रात्री झोपायला सोबतीला कुणी नसल्यामुळे एकतर झोप नीट झाली नव्हती, त्यामुळे अंगात एक विचित्र जडपणा आलेला होता. उठून मी खिडकी उघडली, आणि समोरचं दृश्य पाहून अंगातली सगळी मरगळ कुठच्या कुठे पळाली.

एक गर्द हिरवं जांभुळाचं झाड आणि अदृश्य ठिकाणाहून येणारा कोकिळेचा आवाज. जादूची काडी फिरवावी तसं झालं. पटापट आवरून मी ऑफिसला गेले. त्या दिवशी थोडं लवकर निघून, येताना दोन झाडू, एक केराची बादली, ५-६ डबे, दोन बादल्या, केराची सुपली, पायपुसणी, थोडं वाणसामान असं सगळं सामान घेऊन घरी परतले. आणि झपाट्याने कामाला लागले. संडास, बाथरूम, बेसिन, खिडक्या आणि तिन्ही खोल्या धुवून लखलखीत केल्या. ते धुळकट घर फक्त एक दोन तासांच्या मेहनतीने पुरतं बदलून गेलं होतं. अंघोळ करून गणपतीला दिवा लावला. अमृतनं हे घराचं पालटलेलं रुपडं पाहिलं तेव्हा तोही भलता खुश झाला.

घरी गेल्यावर जेव्हा हि सगळी हकीकत सांगितली तेव्हा डोळ्यांत  पाणी आणून आजी म्हणाली, "लागली माझी नातं संसाराला". हे सगळं आठवलं कि वाटतं, वास्तू  सगळ्या सारख्याच असतात. तिथे घालवलेले क्षण, त्या वास्तूवर आपण केलेलं प्रेम, तिथल्या कडू गोड आठवणी यातून त्याला घरपण मिळतं. त्यानंतर आणि त्या आधी मी अनेक ठिकाणी वास्तव्य केलं पण विक्रोळीच्या घराचा अनुभव मनात घट्ट बसून राहिलेला आहे.