Friday 11 August 2017

आमची माती, आमची माणसं

देशस्थी गोतावळा लाभलेल्या आमच्या घरी उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांना नेहमी पाहुण्यांचा राबता असायचा. आणि साहजिकच आम्हालाही सुट्टीला जायला अनेक हक्काच्या जागा होत्या. आत्या, मावश्या, आजोळ यांचा तुटवडा नव्हता. अनेक ठिकाणी अनेक सुट्ट्या घालवल्या आणि प्रत्येक सुट्टीची वेगळी खासियत असायची. पण मोठं होईल तसं हे आत्या-मावशांकडे सुट्टीला जाणं जवळ जवळ बंदच झालं, अर्थात पोटापाण्याच्या उद्योगाला लागल्यावर सुट्ट्याही इतिहासजमा झाल्या.

माझं कॉलेज संपत आलं तसं आम्ही ठरवून दर वर्षी पंधराएक दिवस आमच्या गावी सुट्टीला जायला लागलो. शक्यतो हिवाळ्याच्या दिवसांत, पाऊस कमी झालेला असताना आणि कडाक्याची थंडी पडलेली नसताना आम्ही तिकडे दौरा काढायचो. मुक्काम पोस्ट कसबा सांगाव, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर...!! पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रीन बेल्टमध्ये असलेल्या या गावात भाजीपाला, दूध-दुभतं आणि माणुसकीची रेलचेल.

मी tcs ला गेल्यावरही पुढची २-३ वर्षे या मार्गशीर्षाल्या सुट्टीसाठी माझ्या रजा राखून ठेवायचे. आम्ही सुट्टीला १०-१५ दिवस गावी जायचो. २०१२ मध्ये घरातल्या तुळया काढून गिलावा केला. आमच्या दादांनी तो सगळा लाकूडफाटा पोत्यात भरून ठेवला. मग आम्ही सुट्टीला गेल्यावर आईनं चूल पेटवली, जळण भरपूर होतंच. मग सकाळ संध्याकाळ भाकरी, पोकळ्याची ताजी भाजी आणि मातीच्या घरातलं आंबट गोड दही असा मेनू असायचा. वर वायलीवर शिजलेला डाळ भात. स्वर्गसुख म्हणतात ते हेच असावं नक्की.

सकाळी अंघोळीचं पाणीही चुलीवरच तापवलं जायचं. चुलीवर पितळेच्या हंड्यात तापवलेल्या पाण्यात गर्मी खूप असते. हे पाणी पुष्कळ वेळ कढत राहतं. जो शेवटी अंघोळ करणार त्याची चैनी, कारण त्याला भरपूर ऊन ऊन पाणी मिळायचं. सकाळच्या गुलाबी थंडीत हंड्याच्या चुलीपुढे बसणं म्हणजे जन्नत !! थोडं धुरकट पण अगदी उबदार वाटायचं तिथे. आगीत रसरसलेले लालेलाल विस्तव तासन् तास पाहणं हा माझा आवडीचा कार्यक्रम.

अशाच एका सुट्टीत आम्ही गावातल्या देवाप्पा काकांच्या भजनी मंडळाला घरी भजनाला बोलावलं होतं. ही मंडळी कुठल्याच बिदागीची मागणी नाही करत. यांना जेवायला तर्रीवाली आमटी आणि मसाले भात करायचा. जेवणं झाली की घरात उदबत्तीचा घमघमाट पसरतो, सगळ्यांच्या कपाळावर बुक्क्याचे टिळे येतात, पेटीच्या सुरावर तबला आणि डग्गा सेट होतो, आणि मग टाळ-मृदंग गरजू लागतात. "जय जय राम कृष्ण हरी.."नं भजनाची सुरुवात होते आणि पंचपदीने शेवट. कुठल्याही सिनेगीतांची चाल नसलेली अस्सल वारकरी संप्रदायातली ही भजनं पहाटे दोनेक वाजेपर्यंत रंगतात.

गावाकडे आम्ही टीव्हीला डिश कनेक्शन घेऊन ठेवलं होतं. पण कधी टीव्हीपुढं बसल्याचं स्मरणात नाही. दुपारी जेवण झाल्यावरचा प्रोग्रॅम ठरलेला असायचा. आजीची अर्ध्या पाऊण तासांची वामकुक्षी झाली की डिशवर विविध भारती लावून आजी, आई-दादा आणि मी पत्त्यांचा डाव टाकायचो. तसे आम्ही सगळेच पत्ते खेळायला पटाईत. अनेक डाव आम्हाला यायचे, पण आम्ही नेहमी "बोले सो करे" अर्थात judgement हा एकच डाव टाकायचो. आणि सगळेचजण अगदी विजिगीषू वृत्तीने खेळणारे!

मार्गशीर्ष महिन्यात भूक पण कडकडून लागायची. तिन्हीसांजेला कुणीतरी ताजा ताजा पाला शेतातून काढून आणून द्यायचं. गवळण नुकतं धार काढलेलं कोमट दूध आणायची. संध्याकाळच्या वेळेला कोवळी कणसं, ओल्या हरभऱ्याचे घाटे, मातकटलेली कोवळी आणि गोड गाजरं, एखाद् दुसरी शेवग्याची शेंग, ज्वारीची मऊ धाटकं, खरवसाचं दूध, ताजी ताजी रताळं असं काही बाही कुणी कुणी रोज घरी आणून द्यायचं. ही मार्गशीर्षातली सुट्टी मला जवळ जवळ वयाच्या पंचवीशीपर्यंत अनुभवता आली.

आता गाव सुधारला, सगळीकडे पाणी आलं, आणि ऊस व्हायला लागला. माणसं मिळेनात म्हणून मातीच्या भिंतींना गिलावे केले गेले आणि सारवणं बंद पडली. पाण्याला मोटर्स बसल्या, शहाबादी फारशा जाऊन तिथे चकचकीत टाईल्स आल्या. पण सुदैवाने अजून गावाकडच्या माणसातलं माणूसपण टिकून आहे. आमच्या पुढल्या पिढीला कदाचित आम्ही अनुभवलेला मार्गशीर्ष आम्ही देऊ शकू की नाही ते माहित नाही. पण त्या माणसांचा ओलावा, त्या मातीची ओळख नक्कीच करून देऊ !!