Tuesday 28 July 2020

सहज सोपी अन्नपूर्णा - भाग ५ - काकडीचे घावन

समस्त खाद्यप्रेमींना सप्रेम नमस्कार. हे सदर सुरू केल्यापासून मला आपल्या सर्वांकडून भरभरून प्रतिक्रीया  येत आहेत, आणि त्याचबरोबरीने तुम्ही हे पदार्थ स्वतः करून फोटो पण पाठवून देताय याचा मला खूप आनंद आहे. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. 🙏

आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे, नेहमीप्रमाणेच कमी सामग्री, आणि कमी प्रक्रिया केलेले काकडीचे घावन.

साहित्य: (६-८ घावने होतील इतके)
२ काट्याच्या काकड्यांचा कीस, काकडीचे साल काढून कीस करावा
१ वाटी चिरलेला गुळ
२ वाट्या गव्हाचे पीठ
१ वाटी तांदुळाचे पीठ
चिमूटभर मीठ
अर्धा चमचा वेलची पावडर

कृती:
काकडीच्या कीसामध्ये गुळ घालून १०-१५ मिनिटे ठेवा, तो हळूहळू विरघळायला लागेल. मग हाताने हा गूळ नीट मिसळून घ्या. यात बाकीचे सगळे साहित्य घेऊन सरबरीत कालवून घ्या. पाणी घालूच नका, काकडीला आपोआप जे पाणी सुटते त्यातच पीठ कालवले जाते.







आता एका नॉन-स्टिक पॅनवर किंचित तेल घाला आणि त्यावर पळी-दीड पळी मिश्रण घालून त्याचे घावन घाला. दोन्ही बाजूने खरपूस भाजून, साजूक तुपाबरोबर खायला घ्या गरमा गरम.







आहे किनई, फर्मास मेनू...मग वाट कसची पाहताय...आणा काकड्या, नि घाला घावन...

सांगा कसं होतंय..


Saturday 25 July 2020

सहज सोपी अन्नपूर्णा - भाग ४ - गवारीच्या शेंगांची चटणी

काय मंडळी कसे आहात? मला आशा आहे की सहज सोपी अन्नपूर्णा हे सदर तुम्हाला आवडत असेल.

श्रावण महिन्यापासून सुरू होणारे सणवार आणि त्यासाठी होणारा  नैवेद्याचा स्वयंपाक हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. चटण्या, कोशिंबीरी, भाज्या, निरनिराळ्या प्रकारच्या आमट्या, वेगवेगळे भाताचे प्रकार करून संग्रसंगीत नैवेद्याचे ताट "इदम् न मम" असं म्हणून देवबाप्पापुढे ठेवण्यात एक वेगळीच धन्यता असते.

आज मी याच नैवेद्याला, किंवा रोजच्याच नेहमीच्या स्वयंपाकात लज्जत आणणारी एक चटणी घेऊन आले आहे, चला तर मग पटापट पाहूया, कशी करायची गवारीच्या शेंगांची चटणी...

साहित्य:

- अर्धी वाटी निवडलेल्या गवारीच्या शेंगा
- १-२ मिरच्या, तिखटपणानुसार
- लसूण ३-४ कुड्या (नेवैद्याच्या स्वयंपाकात लसूण नाही घातला तरी चालेल)
- कोथिंबीर
- ओवा
- जिरे
- मीठ चवीनुसार
- तेल चमचाभर
- साखर चिमूटभर
- दही

कृती:

एका लोखंडी तव्यात, किंवा कढईत तेल घालून त्यात जिरे, ओवा, ठेचलेला लसूण, मग मिरचीचे तुकडे असे एकामागून एक घालावे. मग गवारीच्या शेंगा घालून कच्चट वास जाईपर्यंत मंद आचेवर छान परतून घ्यावे.

हे मिश्रण थोडं थंड झालं की त्यात कोथिंबीर, मीठ, साखर, चमचाभर दही असे घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.

झाली तय्यार गवारीची चटणी.

तुम्ही ही चटणी बिन लसणाची करून नेवैद्यावर घालू शकता. भाकरी, पोळी किंवा अगदी ब्रेडसोबतदेखील खाण्याची लज्जत वाढवणारी, चटपटीत, आणि झटपट होणारी गवारीची चटणी नक्की करून पहा.

आणि कंमेंट करून सांगा पटापट, अवडतेय का 😊

Thursday 23 July 2020

सहज सोपी अन्नपूर्णा - भाग ३ - तांदूळ पिठीची उकडशेव

कधी कधी नेहमीच्या पोहे, उपमा अशा न्याहारीचा जाम कंटाळा येतो. किंवा कधी संध्याकाळी  चारच्या भुकेला मस्त गरमा गरम काही खायचं असतं. पण उपलब्ध साधनांची कमतरता, किंवा वाढलेलं वजन, किंवा कधी  अजून काही, यामुळे ऑप्शनला असलेले पदार्थ काही उरतच नाहीत. काय? होतं ना तुमचंही असं? मग नक्की करून पहा तांदूळ पिठीची उकडशेव.

साहित्य: (चार माणसांसाठी)

४ वाट्या तांदळाचे पीठ
१ वाटी आंबट ताक
लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण २-३ चमचे
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी तेल, जिरे, आणि तीळ

कृती:

एका भांड्यात तांदळाचं पीठ, मीठ, कोथिंबीर-लसणाचं वाटण एकत्र करावं, आणि त्यात ताक घालून घट्ट मळून घ्यावं. गरज लागल्यास थोडं पाणी घालावं. ताक जास्त आंबट नसेल तरी हरकत नाही.


मळलेला गोळा चकली यंत्रात घालून त्याची शेव पाडावी आणि उकडून घ्यावी. आमच्याकडे ५-६ जण असल्यामुळे मी इडली पात्रात उकडून घेते. तुमच्याकडे मोदक उकडायची जी यंत्रणा असेल त्यातही उकड काढली तरी चालेल.


उकडलेली शेव ताटलीत घालून वरती मस्त खमंग तीळ, जिऱ्याची फोडणी घालून खायला घ्या.
पैजेवर सांगते, पोरा-टोरांना तर आवडेलच पण मोठेही खुश होतील.
मग आता झटपट झटपट तयारीला लागा आणि बनवून पहा उकडशेव. आणि हो, कशी झालीये हे सांगायला विसरू नका.


#सहज_सोपी_अन्नपूर्णा

Wednesday 22 July 2020

सहज सोपी अन्नपूर्णा - भाग २ - डांगर

लॉकडाऊन असू दे किंवा नसू दे, भाजी किंवा कोशिंबीर कोणती करावी हा स्वयंपाकघरात शिजणारा पहिला प्रश्न असतो. कधी मोठ्या सुट्टीवरून परत घरी आल्यावर, किंवा घरी विशेष भाजीपाला नसेल अशावेळी तर हा प्रश्न हमखास पडतोच.

अशा खिंडीत गाठणाऱ्या प्रश्नाला चोख आणि पौष्टिक उत्तर म्हणजे डांगर. चला तर मग पाहू...भाकरी असो किंवा पोळी यांच्याशी छान गट्टी करणारे डांगर..!!

साहित्य:
१ वाटी धुवून वाळवलेली उडदाची डाळ
जिरे, धणे - प्रत्येकी ३-४ छोटे चमचे

कृती:
एका जाड बुडाच्या कढईमध्ये उडीद मंद आचेवर भाजून घ्यावेत. बाहेर हॉल मधून "कसला खमंग वास येतोय" अशी विचारणा झाली म्हणजे उडीद भाजून झाले असं समजा. मग त्याच कढईत धणे आणि जिरे भाजून घ्या. हे सगळं थंड झालं की मिक्सर मधून एकदम छान बारीक पूड करून घ्या. आणि ही पूड बरणीत भरून ठेवा. फ्रिजबाहेरदेखील अनेक दिवस (१-२ महिने तरी, किंवा जास्तच) टिकते.

काय?? आहे किनई सोप्पी कृती. अत्यंत कमी सामग्री, अत्यंत कमी प्रक्रिया(प्रोसेससिंग) केलेले पदार्थ हीच आपल्या या सदराची खासियत आहे. आता सांगते हे खायचं कसं.

ज्या ज्या वेळी भाजी किंवा कोशिंबीर काय हा प्रश्न येतो तेव्हा सॉस वगैरे खाण्यापेक्षा तुम्ही खाऊ शकता डांगर. आपण बनवलेलं डांगर २-३ चमचे घ्या, त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घाला. मस्त चुरचुरीत मोहरी, कढीपत्ता, आणि भरपूर हिंगाची फोडणी द्या. असेल तर एखादी भरली मिरची किंवा सुकी लाल मिरची तळून, चुरून टाका. चवीनुसार मीठ घालून आणि थोडंसं दही घालून मिसळा. झालं मग खमंग आणि पौष्टिक डांगर तय्यार.

बनवा पटापट, आणि सांगा कसा होतोय बेत.
माहितीये का, डांगर भाकरी दे नाहीतर विंचू चावेल..!!

सहज सोपी अन्नपूर्णा - भाग १ - भीम लाडू

सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या डाएट्सच्या प्रकारांमध्ये वारंवार समोर येणारी गोष्ट म्हणजे प्रथिने किंवा प्रोटीन यांचा आहारातील समावेश. आमच्या लहानपणी, आई किंवा आजी चार वाजता खायला म्हणून जो खाऊ बनवायच्या तो असाच मस्त प्रोटीन पॅक्ड असायचा. त्यातलाच एक मस्त, सोप्पा आणि आमच्या घरात सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे भीम लाडू. पहा बनवून आणि सांगा आवडतोय का..

साहित्य:
जाड पोहे, शेंगदाणे, फुटाणे डाळ, किसलेले खोबरे - प्रत्येकी एक वाटी (आवड आणि उपलब्धतेनुसार कमी जास्त प्रमाण चालेल)
तीळ, जवस - प्रत्येकी १ टेबल स्पून
गूळ - एक ते दीड वाटी चिरून किंवा किसून घ्यावा
तूप - ४ टी स्पून, शक्यतो पातळ करून घ्यावे

कृती:
जाड पोहे, शेंगदाणे, फुटाणे डाळ, खोबरे, तीळ आणि जवस हे सर्व वेगवेगळे मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे. "मंद आचेवर" हे नका विसरू. नंतर मिक्सरमध्ये प्रथम तीळ आणि जवस भरड भरड बारीक करून घ्यावे. मग पोहे, शेंगदाणे, फुटाणे डाळ, खोबरे आणि गूळ असं मिक्सरला भरड बारीक करून घ्या. गूळ नीट बारीक झाला पाहिजे. मिश्रण खूप जास्त बारीक नका करू. हा लाडू मस्त चावून चावून खण्यातच खरी चम्मतग आहे.

                                           

आता सगळं मिश्रण ३-४ चमचे तूप घालून मळून घ्या. आणि मग छोटे छोटे लाडू वळून घ्या. लक्षात ठेवा, हाताची चव आणि काळजातली माया पदार्थात उतरायची असेल, तर  मिश्रण मळायला चमचा आणि लाडू वळायला मोल्ड नकोच..

तर मग करून पहा, भीम लाडू, आणि नक्की सांगा आवडतात का..तुम्हाला आणि तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना..

सहज सोपी अन्नपूर्णा

मित्रांनो, आणि मैत्रिणींनो आज श्रावण सुरू झालाय..श्रावण म्हणजे सणवार आणि वेगवेगळा खाऊ मिळण्याची चंगळ असलेला महिना. यानिमित्त मी "सहज सोपी अन्नपूर्णा" या सदराखाली श्रावण महिनाभर रोज एक पौष्टिक पाककृती इथे पोस्ट करणार आहे.

ज्या पारंपरिक पाककृती विशेष लोकप्रिय झाल्या नाहीत किंवा आताच्या काळात बोलायचं तर फारशा ट्रेंडिंग झाल्या नाहीत अशा पौष्टिक आणि बनवायला सहज सोप्या असलेल्या पाककृती आपल्यासमोर आणायच्या हा या उपक्रमाचा एक प्रमुख उद्देश आहे.

काळाच्या नजरेआड झालेले, सहसा विकत न मिळणारे, आणि तरीदेखील करायला अगदी सहज सोपे असलेले पारंपरिक पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. 

आपल्या आजीकडून, आईकडून सहजपणे आपल्याकडे आलेली ही अन्नपूर्णा, ही निव्वळ स्वयंपाकघरात होणारी एक कृती नसून, ती अनेक वर्षांपासून चालत आलेली समृद्ध संस्कृती आहे.

ही संस्कृती जपली जावी, आपल्या सर्वांच्या सोबतीने मला वृद्धिंगत व्हावी म्हणून मी हा उपक्रम सुरू करत आहे. त्यानिमित्ताने आपण आपले स्वयंपाकघरातले अनुभव, गमती जमती एकमेकांना सांगू आणि याचा आनंद घेऊ. आपल्याला इथले खाद्यपदार्थ आणि त्यांचे वेगळेपण निश्चितच आवडेल अशी मला खात्री आहे.

हमेशा की तरह

ती पुरीसारखी अलवार, छोट्याश्या आघातानेही खळ्ळकन् फुटणारी, आणि तो रगड्यासारखा शांत, स्थिर, खालून धग सोसूनही वरतून दाखवून न देणारा. त्याची काही जवळची लोकं माघारी तिला म्हणायची, किती हा तडतडबजा, जरा काही झालं की नुसती कुरकुर. आणि तिच्या जवळची लोकं त्याला म्हणायची, किती गं बाई तो भिडस्तपणा, कधीतरी बोलावं की घडघड. पण ते दोघे एकत्र असले म्हणजे कमालच, कराऱ्या पुरीला मऊसूत रगडा मिळून जी पाणीपुरी बनते ना, अगदी तस्संच! एकमेकांच्या नुसत्या आसपास असण्याने खुलून, फुलून येणारे ते दोघं एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले होते.

पण आज काही वेगळंच होतं चित्र. तशी ती चिडायची त्याच्यावर, भांडायची, हट्ट करायची. पण अबोला कधीच नाही धरायची. बडबड बडबड करत राहायची. पुरी नरम आहे म्हणजे हवामान ढगाळ झालंय हे रगड्याला लग्गेच समजलं.

"ए फुलबाजी, काय बिनसलंय?"

"कुठे काय, मस्त चाललंय आमचं", असं म्हणून एक खोटरडं हसू ओठांवर आलं

"मस्त? मस्त असताना इतकं गोड हसायचं असतं का?"

"तू जादूगार होतास का रे मागल्या जन्मी?"

"अगं भूगोलाचा अभ्यास केलाय ना. हवामान ढगाळ झालेलं कळतं मला"

"बरं"

"मग सांगा ना आम्हाला, फुलबाजीला काय झालंय?"

"फुलबाजीकडे पाहिलंयस का अलीकडे निरखून? सुतळी बॉम्ब झालाय नुसता. दंड, गाल पाहिलेस का किती फोफावलेत?"

"अच्छा, मग थोडी पाणीपुरी कमी खावी", चेहऱ्यावर चेष्टेचा नूर, पुरेपूर.

"तुलाही असंच वाटतं ना? आज शेजारच्या काकूंनी गाठलंच मला गाड्यावर आणि हेच हेच म्हणाल्या. सगळ्यांच्या डोळ्यात माझं पाणीपूरी प्रेम खुपतंय बाकी काही नाही. तुही तसलाच", आता डोळे काठोकाठ भरले, कधीही ओसंडून वाहू लागतील इतके.

"ए फुलबाजी, अगं मजा केली गं. काय त्या काकू सांगतात आणि तू ऐकते. त्यांना सांग रोज तुम्ही अजून साखरझोपेत असता ना तेव्हा आख्खे पाच किलोमीटर चालून आलेले असते मी", तिला मिठीत ओढत, कुरवाळत.

"काही खोटं कौतुक नकोय. हिम्मत असेल तर त्रुएस्ट फीडबॅक दे की", मिठीत न जाता, हट्टाने.

"ए फुलबाजी, नको ना चिडू. अगं मजा केली. बर चल माझ्यासोबत चल पाणीपुरी खाऊ. बघूच कोण काय म्हणतंय", तिचा हात आग्रहाने खेचत.

"मुळीच नाही. तोंडही नाही पाहणार पुन्हा पाणीपुरीचं"

"किती दिवस?"

"तू मला चॅलेंज देतो आहेस? बघ बरोब्बर एक महिना. आणि मगच खाईन पाणीपुरी. तेही मोजून 6 पुऱ्या बस्स"

हुश्श हा निर्धार जन्मभराचा नाहीये हे समजल्यावर तो सुखावला. कारण तिला पाणीपुरी आवडायची, आणि त्याला पाणीपुरी खाणारी ती.

30 दिवसांनंतर,

"ए फुलबाजी आज किती तारीख गं?"

"अठरा, का रे?"

"अग्गं मुली, अभिनंदन, तुझं चॅलेंज पूर्ण केलंस तू, चल ना गं पाणीपूरी खाऊ आता"

"अरे हो, खरंच की. चल आपण सेलिब्रेट करू. पण फक्त 6 पुऱ्या"

"हो हो हो, चल तर खरं"

"भैय्या मॅडम को एकदम मस्त गोलगप्पा खिलाओ."

"तू नाही?"

"आधी तू. तू मनसोक्त खा, नि मी तुला मनसोक्त पाहतो."

"काहीपण, माझ्यात काय आहे पाहण्यासारखं?"

"तू खा गं"

मग ती एकेक पुरी तोंडात घेत होती, आणि ती पुरी फुटून पाणी तोंडभर पासरायचं तेव्हा तिचे इवलेसे डोळे मिटून खोलवर श्वास घ्यायची..

.. पण सहाव्या पुरीला ती म्हणाली
"ही शेवटची हां"

"ए फुलबाजी, खा ना अजून"

"अजिबात नाही, आता तू खा"

मग त्यानं त्याच्या 5 पुऱ्या खाल्ल्या, आणि म्हणाला,
"भैय्या बस, हो गया. आखरीवाली नही चाहीये"

तिला वाटलं उगीच नियम केला, 6 पुऱ्यांचा. याच्या हातून खायची संधी गेली. मग ती म्हणाली, नेहमीच्या सवयीनं, 
"नही भैय्या देदो आखरीवाली, ज्यादा तीखी, हमेशा की तरह"

"नक्की ना" हे त्यानं डोळ्यातुन विचारलं आणि "अगदी नक्की" हे तिनं डोळ्यातूनच सांगितलं.

भैय्यानं हमेशा की तरह शेवटची तीखीवाली पुरी, त्याच्या ताटलीत ठेवली, ती त्यानं तिच्या ओठांवर अलगद सरकवली हमेशा की तरह,
आणि मग पुरी तिच्या तोंडात, आणि ती त्याच्या मिठीत अगदी अलगद सामावून गेली, हमेशा की तरह!