Wednesday 22 July 2020

हमेशा की तरह

ती पुरीसारखी अलवार, छोट्याश्या आघातानेही खळ्ळकन् फुटणारी, आणि तो रगड्यासारखा शांत, स्थिर, खालून धग सोसूनही वरतून दाखवून न देणारा. त्याची काही जवळची लोकं माघारी तिला म्हणायची, किती हा तडतडबजा, जरा काही झालं की नुसती कुरकुर. आणि तिच्या जवळची लोकं त्याला म्हणायची, किती गं बाई तो भिडस्तपणा, कधीतरी बोलावं की घडघड. पण ते दोघे एकत्र असले म्हणजे कमालच, कराऱ्या पुरीला मऊसूत रगडा मिळून जी पाणीपुरी बनते ना, अगदी तस्संच! एकमेकांच्या नुसत्या आसपास असण्याने खुलून, फुलून येणारे ते दोघं एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडाले होते.

पण आज काही वेगळंच होतं चित्र. तशी ती चिडायची त्याच्यावर, भांडायची, हट्ट करायची. पण अबोला कधीच नाही धरायची. बडबड बडबड करत राहायची. पुरी नरम आहे म्हणजे हवामान ढगाळ झालंय हे रगड्याला लग्गेच समजलं.

"ए फुलबाजी, काय बिनसलंय?"

"कुठे काय, मस्त चाललंय आमचं", असं म्हणून एक खोटरडं हसू ओठांवर आलं

"मस्त? मस्त असताना इतकं गोड हसायचं असतं का?"

"तू जादूगार होतास का रे मागल्या जन्मी?"

"अगं भूगोलाचा अभ्यास केलाय ना. हवामान ढगाळ झालेलं कळतं मला"

"बरं"

"मग सांगा ना आम्हाला, फुलबाजीला काय झालंय?"

"फुलबाजीकडे पाहिलंयस का अलीकडे निरखून? सुतळी बॉम्ब झालाय नुसता. दंड, गाल पाहिलेस का किती फोफावलेत?"

"अच्छा, मग थोडी पाणीपुरी कमी खावी", चेहऱ्यावर चेष्टेचा नूर, पुरेपूर.

"तुलाही असंच वाटतं ना? आज शेजारच्या काकूंनी गाठलंच मला गाड्यावर आणि हेच हेच म्हणाल्या. सगळ्यांच्या डोळ्यात माझं पाणीपूरी प्रेम खुपतंय बाकी काही नाही. तुही तसलाच", आता डोळे काठोकाठ भरले, कधीही ओसंडून वाहू लागतील इतके.

"ए फुलबाजी, अगं मजा केली गं. काय त्या काकू सांगतात आणि तू ऐकते. त्यांना सांग रोज तुम्ही अजून साखरझोपेत असता ना तेव्हा आख्खे पाच किलोमीटर चालून आलेले असते मी", तिला मिठीत ओढत, कुरवाळत.

"काही खोटं कौतुक नकोय. हिम्मत असेल तर त्रुएस्ट फीडबॅक दे की", मिठीत न जाता, हट्टाने.

"ए फुलबाजी, नको ना चिडू. अगं मजा केली. बर चल माझ्यासोबत चल पाणीपुरी खाऊ. बघूच कोण काय म्हणतंय", तिचा हात आग्रहाने खेचत.

"मुळीच नाही. तोंडही नाही पाहणार पुन्हा पाणीपुरीचं"

"किती दिवस?"

"तू मला चॅलेंज देतो आहेस? बघ बरोब्बर एक महिना. आणि मगच खाईन पाणीपुरी. तेही मोजून 6 पुऱ्या बस्स"

हुश्श हा निर्धार जन्मभराचा नाहीये हे समजल्यावर तो सुखावला. कारण तिला पाणीपुरी आवडायची, आणि त्याला पाणीपुरी खाणारी ती.

30 दिवसांनंतर,

"ए फुलबाजी आज किती तारीख गं?"

"अठरा, का रे?"

"अग्गं मुली, अभिनंदन, तुझं चॅलेंज पूर्ण केलंस तू, चल ना गं पाणीपूरी खाऊ आता"

"अरे हो, खरंच की. चल आपण सेलिब्रेट करू. पण फक्त 6 पुऱ्या"

"हो हो हो, चल तर खरं"

"भैय्या मॅडम को एकदम मस्त गोलगप्पा खिलाओ."

"तू नाही?"

"आधी तू. तू मनसोक्त खा, नि मी तुला मनसोक्त पाहतो."

"काहीपण, माझ्यात काय आहे पाहण्यासारखं?"

"तू खा गं"

मग ती एकेक पुरी तोंडात घेत होती, आणि ती पुरी फुटून पाणी तोंडभर पासरायचं तेव्हा तिचे इवलेसे डोळे मिटून खोलवर श्वास घ्यायची..

.. पण सहाव्या पुरीला ती म्हणाली
"ही शेवटची हां"

"ए फुलबाजी, खा ना अजून"

"अजिबात नाही, आता तू खा"

मग त्यानं त्याच्या 5 पुऱ्या खाल्ल्या, आणि म्हणाला,
"भैय्या बस, हो गया. आखरीवाली नही चाहीये"

तिला वाटलं उगीच नियम केला, 6 पुऱ्यांचा. याच्या हातून खायची संधी गेली. मग ती म्हणाली, नेहमीच्या सवयीनं, 
"नही भैय्या देदो आखरीवाली, ज्यादा तीखी, हमेशा की तरह"

"नक्की ना" हे त्यानं डोळ्यातुन विचारलं आणि "अगदी नक्की" हे तिनं डोळ्यातूनच सांगितलं.

भैय्यानं हमेशा की तरह शेवटची तीखीवाली पुरी, त्याच्या ताटलीत ठेवली, ती त्यानं तिच्या ओठांवर अलगद सरकवली हमेशा की तरह,
आणि मग पुरी तिच्या तोंडात, आणि ती त्याच्या मिठीत अगदी अलगद सामावून गेली, हमेशा की तरह!

1 comment: